आमदार डॉ. अतुलबाबा भोसले; कराड तालुका खरीप हंगाम आढावा बैठक
कराड/प्रतिनिधी : –
कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी राज्यात विक्रमी उत्पादन घेतले आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी वेगवेगळे प्रयोग करून शेती करतात. त्यांच्यापर्यंत जाऊन कृषी विभागाने योजना पोचवल्या पाहिजेत. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत तालुकास्तरावर पुरस्कार द्यावेत, त्यासाठी सहकार्य करू, असे प्रतिपादन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.
आढावा बैठक : कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगाम आढावा बैठक मंगळवारी प्रशासकीय कार्यालयात झाली. यावेळी ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी आमदार मनोज घोरपडे, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, उपविभागीय कृषी अधिकारी समीर पवार, तहसीलदार कल्पना ढवळे, युवराज पाटील, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, सहकार निबंधक कार्यालयाचे जाधव, पंचायत समितीचे कृषी अधिकारी संतोष जाधव, कृषी अधिकारी कोमल घोडके, शीतल नांगरे, प्रताप भोसले, अभिजित पाटील, ओंकार बर्गे आदींसह शेतकरी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक, खते-बियाणे विक्रेते, कृषी कर्मचारी उपस्थित होते.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवा : कृषी विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या योजना या सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचे काम कराड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झाले पाहिजे. त्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार मनोजदादा घोरपडे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले.
