महामार्गाच्या रखडलेल्या कामांसंदर्भात रास्ता रोको करणार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

दादा शिंगण यांचा इशारा; ‘काम कमी आणि गोंधळ जास्त’ अशी ठेकेदार कंपनीची अवस्था

कराड/प्रतिनिधी : –

पुणे-बेंगलोर महामार्गाचे काम सध्या संथगतीने सुरू आहे. कराड व मलकापूर परिसरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम रखडले असून अपुऱ्या कामांमुळे पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे महामार्गाचे काम करताना ‘काम कमी आणि गोंधळ जास्त’ घालणाऱ्या शासकीय यंत्रणेविरोधात मंगळवारी रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते, मनसेचे तालुकाध्यक्ष दादा शिंगण यांनी दिला.

पत्रकार परिषद : याबाबतची माहिती देण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेचे बोलत होते. यावेळी पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

पाच कोटींचे डांबरीकरण करून घेतले : दोन वर्षांपासून महामार्गाचे काम चालू आहे. तेंव्हापासून आवश्यक त्या नागरी सुविधा दिल्या गेलेल्या नाहीत, असे सांगत श्री. शिंगण म्हणाले, दोन वर्ष आंदोलन करून पाच कोटींचे मळाईदेवी पतसंस्था (नांदलापूर) ते कोल्हापूर नाका दरम्यान महामार्गाच्या दोन्ही सेवा रस्त्यांवर डांबरीकरण करून घेतले आहे.

लोकहितासाठी आंदोलने : सातत्याने नागरिक, शालेय विद्यार्थी, वाहनधारक, स्थानिकांना व व्यापाऱ्यांना त्रास होवू नये, म्हणून आंदोलन करीत आहे. वेळोवेळी या आंदोलनांना यश येऊन नागरिकांच्या समस्या सोडवल्या असल्याचे श्री. शिंगण यांनी सांगितले.

काम सोडून गेल्यामुळे दुरावस्था : गेल्या महिनाभरापूर्वीच डी. पी. जैन कंपनीचे अनेक कर्मचारी वेतन आणि निर्वाह भत्ता न मिळाल्यामुळे निम्यातून काम सोडून गेल्यामुळे मोठी दुरावस्था झाली आहे. रस्त्याकडील अनेक ठिकाणी गटारे उघडी आहेत. त्याचा स्थानिक नागरिकांना मोठा धोका आहे. नव्याने येणारे अधिकारी कायम नाहीत. ते कंत्राटी पद्धतीने येतात. त्यामुळे ते लोक काम अर्ध्यावर काम सोडून जात आहेत.

स्थानिकांच्या जीवाला धोका : काम करणाऱ्या कंपनीने गटारे आणि ओढ्याच्या पाण्याचे नियोजन केले होते. मात्र, सध्या ओढे, नाले बुजवल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणताही मार्ग नाही. बाजूची गटारे पाच फुटांचीच आहेत. त्यामुळे पावसाळ्यात तलावासारखी परिस्थिती निर्माण होणार आहे. जुन्या गटारांवरील मोठी झाकणे वेगवेगळ्या ठिकाणी फुटली आहेत. त्यातून येणारे पाणी खड्ड्यात साचते. ते खड्डे दिसत नसल्याने स्थानिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असल्याचे श्री. शिंगण यांनी सांगितले.

प्रशासनाने योग्य काळजी घ्यावी : पुलाखाली नवीन गटार बांधण्यात आले असून त्याचे पाणी थेट नदीपात्रात सोडले आहे. ओढा किंवा पानंद रस्त्याला ती गटारे जोडलेली नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने त्याची योग्य ती काळजी घ्यावी. तसेच महामार्गाच्या सेवा रस्त्याला जुनी गटारे आहेत, त्यातीकानी नवीन गटार होणार आहे का नाही? याचा खुलासा करावा.

मंगळवारी रास्ता रोको : या सर्व समस्या, प्रश्नांबाबत मनसेतर्फे ढेबेवाडी फाटा, (मलकापूर) येथे महामार्गाच्या सेवा रस्त्यावर मंगळवार (दि. ६) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे श्री. शिंगण यांनी यावेळी सांगितले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!