दहा कृषीविषयक, तर एका विशेष पुरस्काराचे शनिवारी वितरण – सौ. स्वाती पिसाळ
कराड/प्रतिनिधी : –
जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचा सन्मान करण्यासाठी आस्था सामाजिक विकास सेवा संस्थेच्या वतीने दहा आदर्श व प्रगतशील शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच एक विशेष पुरस्कारही यावेळी देण्यात येणार आहे. या सन्मानार्थींना महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर मान्यवरांच्या हस्ते कृषीभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्वाती पिसाळ यांनी दिली.
सामाजिक उपक्रम : आस्था सामाजिक संस्थेमार्फत वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. तसेच महिलांना विविध प्रकारच्या गृह व लघु उद्योगांबाबत मार्गदर्शन करून, प्रशिक्षण देऊन उद्योजक बनवण्यासाठी प्रयत्न केले जातात.
पुरस्कारांचे दुसरे वर्ष : यातच कृषी क्षेत्राशी निगडीत प्रगतशील शेतकरी आणि कृषी पूरक व्यावसायिकांना सन्मानित करण्याचा मानस ठेऊन संस्थेतर्फे गतवर्षीपासून विविध पुरस्कार सुरु करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे हे दुसरे वर्ष आहे.
मान्यवरांच्या हस्ते वितरण : या कार्यक्रमासाठी आ. सदाभाऊ खोत हे प्रमुख पाहुणे असून ज्योर्तिमय फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. सुवर्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शनिवार (दि. ३) मे रोजी संध्याकाळी ४ वाजता हॉटेल सफायर (मलकापूर) कराड येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
आवाहन : तरी ग्रामीण भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आस्था सामाजिक विकास सेवा संस्थेच्या अध्यक्ष सौ. पिसाळ यांनी केले आहे.
या सन्मानार्थींचा होणार गौरव : या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या सन्मानार्थींची नावे व प्रकार पुढीलप्रमाणे आहेत; समीर पाटील – वाठार (रेशीम शेती), महेश जाधव – कापील (टोमॅटो शेती), अर्पिता अमृत खबाले – विंग (कुकुटपालन), बाळासाहेब साळुंखे – वराडे (सेंद्रिय भाजीपाल), सूर्यकांत पवार – वहागाव (पेरु शेती), संजय पवार – वडोली निळेश्वर (फूल शेती), सौ. कांचन कुचेकर – रेवड़ी (कडीपत्ता शेती), जालिंदर सोळस्कर – सोळशी (हायड्रोपोनिक शेती), सौ. मानसी चैतन्य कणसे – शेणोली (दूग्ध व्यवसाय), चंद्रकांत जाधव – कराड (वृक्षमित्र) यांना पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
विशेष पुरस्कार : आपल्या मुलाला थोडासा हातभार लागावा, यासाठी वयाचा विचार न करता रिक्षा चालवणाऱ्या वृद्धा श्रीमती मंगल आबा आवळे – नांदगाव (रिक्षा व्यवसाय) यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
