मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले; शंकरराव खबाले यांच्यासह मान्यवरांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
कराड/प्रतिनिधी : –
देशात आणि राज्यातही कॉंग्रेसची सद्दी संपली आहे. लोकांना गृहीत धरण्याच्या वृत्तीमुळे त्यांचे अधःपतन झाले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कराड दक्षिण मतदारसंघाला अतुलबाबांनी केवळ सुरुंग लावलेला नाहीय, तर काँग्रेसचा हा गड उध्वस्त केलाय, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
विकासकामांचे भूमिपूजन व पक्षप्रवेश : विंग (ता. कराड) येथील रस्ते कामाचे भूमिपूजन, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले यांच्यासह कराड दक्षिणमधील विविध मान्यवरांचा भाजप पक्षप्रवेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

अतुलबाबा 50 वर्षे हलणार नाहीत : ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, पुढची ५० वर्षे अतुलबाबा काही येथून हलणार नाहीत, असे सांगत ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, अतुलबाबांकडे जिल्ह्याचे तरुण नेतृत्व म्हणून पक्ष त्यांच्याकडे पाहत आहे. देशाचे, राज्याचे आणि आपल्या मतदारसंघाचे भविष्य फक्त भाजपात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये भारताला आणून ठेवण्याची किमया केली आहे. सातारा जिल्ह्यात भाजपचा पहिला खासदार तुम्ही निवडून दिला. लोकांच्यात कायम राहिल्याने, लोकांसाठी सतत काम केल्याने यंदा अतुलबाबा निवडून येणार याची मला खात्री होती.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज व्हा : आता आपल्याला पुढे जायचे आहे. आपला मतदारसंघ आणि जिल्हा गतीने पुढे न्यायचा आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी मान्यता : ७५० एचपीच्या आतील पाणी पुरवठा संस्थांना वीजबिल माफीसाठी आम्ही प्रयत्न करू. कराड दक्षिणमधील अनेक रस्त्यांना दर्जान्नोती देण्यास मी मान्यता दिली असल्याचे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
शिवरायांना बदनाम करण्याचे काँग्रेसचे कारस्थान : काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपतींना बदनाम करण्याचे कारस्थान सुरू असते, असा आरोप करत ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, भाजपने शिवाजी महाराजांच्या इतिहासाला जेवढे महत्व दिले, तेवढे काँग्रेसच्या राजवटीत कधीही दिले गेलेले नाही. काँग्रेसने कधीही छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या कार्याला जेवढे पुढे आणायला पाहिजे होते, तेवढे आणले नाही. महाराजांचा इतिहास पुढील पिढ्यांना समजला पाहिजे, यासाठी मोदींनी व भाजप सरकारने निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
निष्ठावंतांची अडचण होणार नाही : राजकीय क्षेत्रात काम करताना संघर्ष करावा लागतो, असे सांगत आ. डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, अनेक गावांत आम्हाला पोलिंग एजंट, स्थानिक कार्यकर्ते मिळत नव्हते. आज अनेक लोक आपल्यासोबत आले. परंतु, जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची अडचण होणार नाही.
विविध कामांसाठी निधीची मागणी : पाणीपुरवठा संस्थांना वीज बिल माफी मिळण्यासाठी, विंग ओढ्यावरील पुलाची उंची वाढविण्यासाठीही प्रयत्न करणार आहे. कराडच्या जुन्या पुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागमार्फत ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही आ. डॉ. भोसले यांनी यावेळी केली.
…म्हणून पक्षांतराचा निर्णय : विंग जिल्हा परिषद गटाच्या विकासाचा अजेंडा घेऊन मी हा निर्णय घेतला असल्याचे सांगत शंकरराव खबाले म्हणाले, २२ गावांतील सर्व कार्यकर्ते यात सामील आहेत. आम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार म्हटल्यावर समोरून कार्यकर्त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला गेला; पण ते थांबले नाहीत. कराड दक्षिणच्या विकासासाठी अतुलबाबा रोल मॉडेल आहेत. भागाचा विकास व भाजप पक्षवाढीसाठी आम्ही सर्व एकनिष्ठपणे अतुलबाबांसोबत काम करू.
मनोगत : माजी आ. आनंदराव पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्तविक हेमंत पाटील, सूत्रसंचालन रामभाऊ सातपुते यांनी केले.
उपस्थिती : कार्यक्रमास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, कृष्णा कारखान्याचे संचालक वसंतराव शिंदे, दयानंद पाटील, सयाजी यादव, धोंडीराम जाधव, बाजीराव निकम, दत्तात्रय देसाई, निवासराव थोरात, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, कराडचे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी नगरसेवक अतुल शिंदे, भारत जंत्रे, आर. टी. स्वामी, डॉ. सारिका गावडे, रेखाताई पवार, राजेंद्र यादव, आनंदराव खबाले, मोहनराव जाधव, सौ. श्यामबाला घोडके आदींची उपस्थिती होती.
कराड दक्षिण भाजपमय करण्याची जबाबदारी
शंकराव खबाले यांचा भाजप प्रवेश ही फक्त सुरुवात आहे. भविष्यात कराड दक्षिण भाजपमय करण्याची जबाबदारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर दिली आहे. त्यानुसार कराड दक्षिण मतदारसंघ पूर्णपणे भगवामय करण्याचे काम सुरू असल्याचे आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले. तसेच महायुती सरकारमध्ये असलेल्या मित्र पक्षांतील लोकांना आमच्याबरोबर एकत्रपणे काम करावे लागेल, असेही त्यांनी माध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.
दक्षिणच्या विकासासाठी निधीचा महापूर आणू
आ. अतुलबाबा भोसले भाजपमध्ये मला वरिष्ठ आहेत. शिवाय ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील आहेत. त्यामुळे त्यांची मागणी मी कधीही डावलू शकत नाही. कराड दक्षिणच्या विकासासाठी निधीचा महापूर आणू, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
