१८ ते २१ मार्च दरम्यान आयोजन; अमेरिकेतील तज्ज्ञ डॉक्टर करणार शस्त्रक्रिया
कराड/प्रतिनिधी : –
कृष्णा विश्व विद्यापीठ आणि अमेरिकेतील स्टँडिंग स्ट्रेट मिशन संस्थेच्यावतीने कृष्णा हॉस्पिटलमध्ये पाठीच्या कण्यामध्ये विकृती असलेल्या रुग्णांसाठी विशेष शस्त्रक्रिया अभियान राबविले जाणार आहे. १८ ते २१ मार्च दरम्यान चालणाऱ्या या अभियानात पाठीच्या कण्यामधील विकृती असणाऱ्या ५ ते २० वर्ष वयोगटातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील रुग्णांवर अमेरिकेतील मणक्यांचे तज्ज्ञ डॉक्टर शस्त्रक्रिया करणार आहेत.
शरीराला आधार आणि संरक्षण देण्याचे काम : मणक्याचे हाड हे मानवी शरीराचे महत्त्वाचे अंग आहे. ते शरीराला आधार आणि संरक्षण पुरवतेच, तसेच छाती आणि पोटातील अवयवांनाही सुरक्षित ठेवते. शिवाय ते मणक्यांच्या हाडांच्या आत स्पाइनल कॉर्डला सामावून घेते; जे मेंदू आणि संपूर्ण शरीर यांच्यातील मुख्य जोडणी आहे. जेव्हा मणक्याला विकृती येते, तेव्हा शरीराची ठेवण आणि संतुलन बिघडते. तसेच हृदय व फुफ्फुसांसारखे महत्त्वाचे अवयव दाबले जातात. भारतामध्ये जगातील सर्वाधिक स्पाइनल विकृतीच्या केसेस नोंदल्या गेल्या आहेत.
मणक्यातील विकृतीची कारणे : कुपोषण, दूषित पाण्याचा पुरवठा, जन्मजात दोष, पोलिओच्या दुष्परिणामांमुळे झालेली गुंतागुंत, अपघात आणि कॅल्शियमची कमतरता अशा विविध कारणांमुळे बऱ्याचदा मणक्यामध्ये विकृती निर्माण होते.
जगभर जागृती करण्याचे कार्य : लवकर निदान, शाळकरी मुलांची नियमित वैद्यकीय तपासणी, गर्भधारणेदरम्यान सावधगिरी, पोषण सुधारणा याबाबत काळजी घेतल्यास, योग्य उपचाराने या विकृतींच्या प्रमाणात घट करता येते. याबाबत जागृती करण्यासाठी अमेरिकेतील स्टँडिंग स्ट्रेट मिशन जगभर प्रयत्न करते.
शस्त्रक्रिया अभियानाचा उद्देश : कराड आणि आसपासच्या जिल्ह्यातील रुग्णांना या उपचारांचा लाभ व्हावा, या उद्देशाने कृष्णा विश्व विद्यापीठाने कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली १८ ते २१ मार्च दरम्यान या विशेष शस्त्रक्रिया अभियानाचे आयोजन केले आहे.
सर्व सोयीसुविधा उपलब्ध : अशाप्रकारच्या जोखमीच्या शस्त्रक्रियांसाठी कृष्णा हॉस्पिटलमधील न्युरोसायन्सेस विभागात सर्व त्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
मोफत व माफक उपचार : या विशेष शस्त्रक्रिया अभियानात ५ ते २० वर्ष वयोगटातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील पात्र रुग्णांवर मोफत, तसेच इतर रुग्णांवर माफक दरात उपचार व शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. तसेच यासाठी लागणारे महागडे इम्प्लांट्सदेखील गरजू रुग्णांना पुरविले जाणार आहेत.
सहभागी होण्याच्या वाहन : तरी संबंधित रुग्णांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी, तसेच शस्त्रक्रियापूर्व तपासणीसाठी कृष्णा हॉस्पिटलमधील न्यूरोसायन्सेस विभागात संपर्क साधावा अथवा ९८२२३२९४१४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
