बाळासाहेब पाटील; कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल
कराड/प्रतिनिधी : –
सह्याद्रि सहकारी साखर कारखाना गेल्या 50 वर्षांपासून सर्वसामान्य सभासदांना न्याय देण्याची भूमिका घेत आहे. हीच भूमिका घेऊन आम्ही कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीला सामोरे जात आहोत. विद्यमान चेअरमन यांनी शेतकऱ्यांसाठी काय काम केले, हे पाहून स्वाभिमानी सभासदच कारखान्याचा भावी चेअरमन ठरवतील, असा विश्वास राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, सह्याद्रि कारखान्याचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
उमेदवारी अर्ज दाखल : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ५ एप्रिल रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सोमवार (दि. ३) रोजी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी आपले दोन अर्ज दाखल केले आहेत. बाळासाहेब पाटील हे आपल्या निवडक समर्थकांसह दुपारी १२.३० च्या सुमारास निवडणूक कार्यालयाजवळ दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आपले अर्ज सहाय्यक निवडणूक अधिकारी अपर्णा यादव व संजय जाधव यांच्याकडे दाखल केले.
२२१ अर्जांची विक्री : सोमवारी १६७ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून आजपर्यंत विक्री झालेल्या अर्जांची संख्या २२१ झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बाळासाहेब पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना वरील उद्गार काढले.
शेतकऱ्यांना पाणीपुरवठा : स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांतून आणि प्रेरणेतून आदरणीय पी. डी. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याची स्थापना केल्याच्या सांगत श्री पाटील म्हणाले, सुरुवातीला कारखाना कार्यक्षेत्रातील कमी उसाचे क्षेत्र पाहता कारखान्याच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आल्या, आरफळ कॅनॉल झाला, हणबरवाडी – धनगरवाडी योजना झाली. त्यामुळे ऊस क्षेत्रात सातत्याने वाढ होत असल्याने कारखान्याची विस्तारवाढ करण्याची भूमिका घेतली.
कारखान्याची विस्तारवाढ : साडेसात हजार टनाचा कारखाना आज साडेआठ ते नऊ हजार टनाचे गाळप करत आहे. भविष्यात आणखी वाढ करून ११ हजार टन दिवसाला ऊस गाळप करण्याचा परवाना कारखान्याने घेतला आहे. ११ हजारांची सरासरी मिळवण्यासाठी साधारण तेरा, साडेतेरा हजार टन प्रतिदिन ऊस गाळप करावा लागणार आहे. त्यासाठी अशा प्रकारच्या मशिनरीचे काम सुरू असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.
२१ तारखे नंतरचे दुसरे स्पष्ट : या निवडणुकीत दुरंगी लढत आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले, याबाबत मला काही कल्पना नाही. आमच्या पॅनेलच्या उमेदवारांबाबत चर्चा झाली असून काहींनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली आहे. काहीजण आज, उद्या व परवा अर्ज दाखल करतील. २१ तारखेनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.
नवीन चेहऱ्यांना संधी : तसेच या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.
सभासद कामाचे अवलोकन करतील : कारखान्याच्या आजी चेअरमन यांना आम्ही माजी चेअरमन करणार असल्याचे विरोधकांकडून बोलले जात आहे. या प्रश्नावर ते म्हणाले, सहकारी कारखान्यात चेअरमन निवडीसाठी आधी पॅनल उभे करावे लागते, त्याला सर्वसामान्य सभासद सहकार्य करून मतदान करतात. निवडणुकीत निवडून आलेले संचालक मंडळ एकाची चेअरमनपदी निवड करतात, ही सहकारी निवडणुकीची प्रक्रिया आहे. चेअरमन निवडीचा अधिकार स्वाभिमानी सभासदांचा आहे. कारखान्याच्या विद्यमान चेअरमन यांचे काम कसे आहे, याचे अवलोकन करून स्वाभिमानी सभासद निर्णय घेतील, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
