माजी आमदार आनंदराव पाटील; विजयनगर येथे शुभचिंतन कार्यक्रम उत्साहात
कराड/प्रतिनिधी : –
प्रेमलाकाकी चव्हाण माध्यमिक विद्यालयामध्ये विजयनगर परिसरातील मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी विद्यालयाची उभारणी करण्यात आली आहे. संस्थेने विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी आतापर्यंत विविध योजना राबविल्या आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रही सुरु केले असून संस्थेने नवीन अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांनी सांगितले.
शुभचिंतन समारंभ : विजयनगर (ता. कराड) येथील प्रेमलाकाकी चव्हाण माध्यमिक विद्यालयात दहावी बोर्ड परिक्षा मार्च 2025 रोजी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मलकापूर रोटरी क्लबचे सलीम मुजावर होते. यावेळी कदम सर, जाधव सर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासासाठी विविध योजना : संस्थेने विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास करण्यासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा माजी आमदार आनंदराव पाटील यांनी घेतला. तसेच काकांनी शिक्षणासाठी केलेल्या विविध सहकार्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी जीवनात यशस्वी होण्यासाठी मनाचा दृढ विश्वास, कष्ट करण्याची तयारी, संस्कार या तीन गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांनी आई- वडील आणि गुरूंनी दिलेले संस्कार आचरणात आणले पाहिजेत. तरच यशाला गवसणी घालता येईल, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
अभ्यासाबरोबर योगसाधना आवश्यक : विद्यार्थ्यांना गुरूचे महत्त्व पटवून दिले. तसेच अभ्यासाबरोबर योगाचेही महत्त्व सांगितले. जीवनात यशस्वी होण्यासाठी गती आणि दिशा दोन्ही महत्वाच्या असल्याचे सलीम मुजावर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांप्रमाणे शिक्षकांचे कार्य : शेतकरी ज्याप्रमाणे शेताची मशागत करतो, आपले पिक फुलवतो; त्याप्रमाणे विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकाला शेतीप्रमाणेच मशागत करावी लागते. त्यानंतर विद्यार्थी हे बहरलेले पीक उद्याचा भारत घडवण्यासाठी तयार होते, असे मत श्री जाधव सर यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना पेनचे वाटप : सलीम पटेल यांच्यावतीने विध्यार्थ्यांना पेनचे वाटप करण्यात आले.
मनोगत : गणेश तांदळे, आयमन पटेल, साक्षी देवकर या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक एम. एन. चव्हाण, सूत्रसंचालन रोहिणी फाळके, दर्शना माने यांनी आभार मानले.
