८७ वर्षीय रुग्णावर कृत्रिम झडप बसविण्याची शस्त्रक्रिया
कराड/प्रतिनिधी : –
येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये ८७ वर्षीय रुग्णावर ‘टावी’ (ट्रान्स कॅथॅटर अवॉर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट) अर्थात हृदयाला कृत्रिम झडप बसविण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. पूर्ण भूल न देता, तसेच चिरफाड न करता करण्यात आलेली ही शस्त्रक्रिया माजी सैनिकांसाठी असलेल्या ई.सी.एच.एस. योजनेअंतर्गत करण्यात आली असून, या रुग्णाला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला.
उपचारासाठी कृष्णेत दाखल : खटाव तालुक्यात राहणारे ८७ वर्षीय विश्वनाथ जाधव (नाव बदलले आहे) यांनी भारतीय सैन्यदलात दीर्घकाळ सेवा बजाविली आहे. गेल्या आठवड्यात त्यांना अचानक छातीत दुखू लागले आणि ते चक्कर येऊन बेशुद्ध पडले. अशावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ सातारा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय तपासणीअंती त्यांच्या हृदयाची मुख्य झडप अरुंद झाल्याचे आढळले. यामुळे त्यांचा रक्तप्रवाह सुरळित होत नव्हता. यावर उपाय म्हणून त्यांना ओपन हार्ट शस्त्रक्रियेचा पर्याय सुचविण्यात आला. पण त्यांचे ८७ वर्षांचे वय आणि अन्य व्याधी लक्षात घेता, हा पर्याय काही अंशी धोकादायक होता. त्यामुळे पुढील उपचारासाठी ते कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.
कोणतीही चिरफाड न करता शस्त्रक्रिया : कृष्णा हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागातील तज्ज्ञांनी त्यांची तपासणी करुन, ओपन हार्ट शस्त्रक्रियेऐवजी ‘टावी’ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ‘टावी’ (ट्रान्स कॅथॅटर अवॉर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट) अर्थात हृदयाला कृत्रिम झडप बसविण्याच्या या शस्त्रक्रियेत कोणतीही चिरफाड न करता, ॲन्जिओप्लास्टी पद्धतीने पायाच्या रक्त वाहिनीतून हृदयाची झडप ओपन केली जाते. कृष्णा हॉस्पिटलमधील हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. अभिजीत शेळके यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाने या ८७ वर्षीय रुग्णावर ही आधुनिक पद्धतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. यासाठी खास अमेरिकन कंपनीचा व्हॉल्व्ह बसविण्यात आला.
माजी सैनिकाला योजनेचा लाभ : सदरचा रुग्ण हा माजी सैनिक असल्याने, ई.सी.एच.एस. योजनेंतर्गत कृष्णा हॉस्पिटमार्फत त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या रुग्णाला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते रुग्णाला पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आला.
‘मॅलिग्नन्ट व्हीटी अब्लशन’ प्रणालीमुळे जीवदान : डॉ. शेळके म्हणाले, कृष्णा हॉस्पिटलमध्ये हृदयरोगावरील सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. नुकतेच कृष्णा हॉस्पिटलमध्ये ‘इंट्राकार्डियाक अल्ट्रासाऊंड’च्या मदतीने ‘मॅलिग्नन्ट व्हीटी अब्लशन’ उपचार प्रणालीच्या माध्यमातून रुग्णास जीवदान देण्यात आले. कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाखाली रुग्णांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आमचा सर्व स्टाफ सदैव कटिबद्ध आहे.
विशेष सहकार्य : या शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे, मेडिकल अॅडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, कृष्णा विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. ए. माशाळकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
खास उपस्थिती : या शस्त्रक्रियेसाठी हैदराबाद येथील ए. आय.जी. हॉस्पिटलचे डॉ. राजीव मेनन प्रॉक्टर म्हणून खास उपस्थित होते. तसेच डॉ. प्रशांत पवार, डॉ. रमेश कवडे, डॉ. सुहास मुळे, कार्डियाक ॲनेस्थेटिक डॉ. सम्राट महाडिक, कार्डियोव्हस्कुलर सर्जन डॉ. सयाजी सरगर यांच्यासह अन्य स्टाफच्या सहकार्याने ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. चिरफाड न करता अत्यंत गुंतागुंतीची मानली जाणारी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्याबद्दल कृष्णा हॉस्पिटलमधील वैद्यकीय तज्ज्ञांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
