विरोधकांना राजकारणासाठी सह्याद्रि’ची सत्ता हवी 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

चेअरमन बाळासाहेब पाटील यांचा घणाघात; कराडात ‘सह्याद्रि’च्या सभासदांचा मेळावा उत्साहात 

कराड/प्रतिनिधी : – 

सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याबाबत विरोधकांकडून जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात असून सुरू त्यांना केवळ राजकारणासाठी कारखान्याची सत्ता हवी आहे. यशवंत विचाराच्या सभासदांना पैशाच्या जोरावर विकत घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु, स्वाभिमानी सभासद विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, अशी घणाघाती टीका कारखान्याचे चेअरमन, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.

सभासद स्नेहमेळावा : आदरणीय पी.डी. पाटील पाणीपुरवठा सहकारी संस्थेच्या पटांगणात सह्याद्रि साखर कारखान्याच्या कराड, मलकापूर, आगाशिवनगर, गोटे येथील सभासदांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात सभासदांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी कारखान्याचे सभासद डॉ. अशोक गुजर, माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुभाष डुबल, महादेव पवार, शहाजी डुबल, संभाजी सुर्वे, आप्पा चांदे, राजेंद्रआबा यादव, अँड. मानसिंगराव पाटील, हणमंतराव पवार यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वाधिक ऊस दर : सह्याद्रि साखर कारखान्याने आजपर्यंत दोन वेळा राज्यात सर्वाधिक दर दिला असल्याचे सांगत श्री पाटील म्हणाले, त्यावेळी मानसिक त्रासही झाला. परंतु, दरात अग्रेसर राहण्याची परंपरा कारखान्याने कायम ठेवली. आज सहकारी साखर कारखान्यांसमोर खासगी कारखान्यांचे संकट उभे असल्याने सहकारी कारखान्यांना चांगले काम करावे लागेल. सहकारी कारखाने कमी झाले, तर खासगी कारखानदार एकत्र येऊन ऊस दर फिरवू शकतात. त्यामुळे सहकारी साखर कारखाने टिकण्यासाठी सभासदांचे योगदान महत्त्वाचे आहे.

वजन काट्या बद्दल अपप्रचार : कारखान्याबाबत विरोधक फेक नेरेटिव्ह पसरवत असून त्यावर सभासदांनी विश्वास ठेवू नये. गेल्या मंगळवारी कारखान्याचे ऊस वजन काटे अचानक तपासण्यात आले. त्यात काहीही फरक नव्हता. तरीही याचा अपप्रचार खासगी कारखानदार करत आहेत. दुर्दैवाने काही लोक या अपप्रचाराला बळी पडत आहेत.

ऊस घालेल त्याला सभासदत्व : कारखान्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याने सभासदांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यात कोणतीही राजकारण नाही. कारखान्याला ऊस घालेल, त्याला सभासदत्व देण्याची स्वर्गीय पी. डी. पाटील यांनी घालून दिलेली परंपरा यापुढेही कायम ठेवण्यात येईल, असे सांगताना श्री पाटील म्हणाले, कोणतेही संकट मी मोठे समजत नाही. सभासदांच्या पाठिंब्याच्या जोरावर या संकटाला सामोरे जाऊ. ज्या विश्वासाने सभासदांनी माझ्यावर कारखान्याची जबाबदारी सोपवली, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. कारखाना निवडणुकीत जे मुद्दे पुढे येतील, त्याला त्याच्याच भाषेत समर्थपणे उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विघ्नसंतोषींना थारा देऊ नका : सह्याद्री कारखान्याची निवडणूक बाळासाहेब पाटील यांच्या बाजूने एकतर्फी होणार असून सभासदांनी विघ्नसंतोषी लोकांना थारा देऊ नये, असे आव्हान माजी नगराध्यक्ष जयंतराव पाटील यांनी व्यक्त केले.

सभासद सुज्ञ : विरोधकांच्या केवळ वल्गना सुरू आहेत. परंतु, कारखान्याचा सभासद सुज्ञ असून तो कोणत्याही प्रवृत्तींना थारा देणार नसल्याचे अँड. मानसिंगराव पाटील यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी अधिकराव पवार, मलकापूरचे माजी नगरसेवक राजेंद्र यादव, दिलीप घोडके, डॉ. अशोक गुजर यांची भाषणे झाली. प्रस्ताविक अँड. सतीश पिसाळ, राजेंद्र माने यांनी आभार मानले.

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!