भरत देसाईंचे महावितरणला निवेदन; शेतकरी व उर्जामंत्र्यांच्या समन्वय बैठकीची मागणी
कराड/प्रतिनिधी : –
ओगलेवाडी (ता. कराड) येथील महावितरणच्या कार्यालयाकडे कृषी पंपांना वीज कनेक्शेन मिळण्यासाठी सन २०२३-२४ मध्ये अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. परंतु, त्यांना अद्याप वीज कनेक्शेन न मिळाल्यामुळे त्यांच्यात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने राज्याच्या उर्जा मंत्र्यांलयात संबंधित अर्जधारक शेतकरी व मंत्री महोदयांच्या उपस्थितीत समन्वय बैठक लावून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी भाजपच्या किसान मोर्चाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष भरत देसाई यांनी केली आहे.
निवेदन : सदर मागणीचे निवेदन नुकतेच भारतीय जनता पार्टीच्यावतीने ओगलेवाडी महावितरण कार्यालयाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले. यावेळी भरत देसाई यांच्यासह भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष क्षितीज वाघमारे उपस्थित होते.
मोफत वीज देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय : राज्य शासनाने शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा अत्यंत चांगला निर्णय घेत त्याची अंमलबजावणीही केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारच्या या धोरणात्मक निर्णयाबाबत शेतकऱ्यांमध्ये निश्चितच समाधानाचे वातावरण आहे.
अर्ज करूनही शेतकऱ्यांना कनेक्शन मिळेना : सन २०२३-२४ मध्ये ओगलेवाडी येथील महावितरणच्या कार्यालयाकडे कृषी पंपांना वीज कनेक्शेन मिळण्यासाठी कराड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले असून संबंधित शेतकऱ्यांना अद्याप वीज कनेक्शन मिळालेली नाहीत. कनेक्शन मंजूर होऊनही त्याची जोडणी मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून त्यांना मानसिक व शारीरिक त्रासाचा सामनाही करावा लागत आहे. काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून पाईपलाईन केली आहे. मात्र, पाणी उपलब्ध असूनही वीज कनेक्शनअभावी त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे.
वीज कनेक्शन देण्यास स्थगिती : महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाच्या सुचनेनुसार आपल्या कार्यालयाकडून विद्युत कनेक्शन देणे सध्या स्थगीत केले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये शासनाबाबत उदाशिनता दिसून येत आहे.
समन्वय बैठकीची गरज : राज्यशासन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असताना शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत व शासनाच्या योग्य धोरणाबाबत सकारात्मक चर्चा होण्यासाठी, त्यातून शेतकऱ्याच्या हिताचे व हक्काचे निर्णय होण्यासाठी शेतकरी व उर्जा मंत्रालयात समन्वय साध्यण्याच्या दृष्टीने अशाप्रकारची बैठक होणे गरजेचे आहे.
सौर ऊर्जास्त्रोतावर विचार व्हावा : राज्य शासनाने शेतकऱ्यांना कायमस्वरूपी मोफत वीज मिळण्यासाठी वीज पंपांना सोलर उर्जास्त्रोताची जोड देण्याची चांगली योजना आणली आहे. मात्र, कृषी पंपासाठी सोलर उर्जास्त्रोत वापरण्यामध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, प्रत्यक्ष योजनेचे नियम, अटी व शर्थींचा सखोल विचार करून चर्चेअंती शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत दिशादर्शक मार्ग निघू शकतो. उर्जामंत्री स्वतः शेतकऱ्यांच्या हितासाठी कायमस्वरुपी कार्यरत असल्यामुळे ते या बैठकीचे स्वागत करून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी व प्रश्न निकाली काढतील. यामुळे राज्यशासन व शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर करण्याचे माध्यम बनून आपण सदरच्या समन्वय बैठकीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी भरत देसाई यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
