कराड/प्रतिनिधी : –
स्टेट ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी कराड तालुक्याचे सुपुत्र गणेश पवार यांची 2025 ते 2028 या सालाकरीता निवड करण्यात आली आहे. गणेश पवार हेही एक आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
नियुक्तीपत्र प्रधान : गणेश पवार यांना बुधवारी स्टेट ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सी. ए. तांबोळी, महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव बापूसाहेब घुले व कराड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
पत्रकारांचा सन्मान : गणेश पवार हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कराड तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान व्हावा, या हेतूने गणेश पवार हे विश्वराज उद्योग समूहाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे पत्रकांरासाठी कार्यक्रम घेत असतात. यावेळीही त्यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधत पाचवड फाटा येथील विश्वराज हॉटेल येथे पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.
मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्टेट ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सी. ए. तांबोळी, महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव बापूसाहेब घुले व कराड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत गणेश पवार यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
उपक्रम कौतुकास्पद : याप्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप म्हणाले, गणेश पवार यांनी अगदी कमी वेळात पत्रकारांसाठी केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. ते नेहमीच समाजकार्यात पुढे असतात. त्यांना खेळाची आवड असून ते नॅशनल, इंटरनॅशनलपर्यंत खेळाडू घेऊन गेलेले आहेत. त्यांच्याकडून भावी पिढीला शिकण्यासारखे खूप आहे.
आठवणींना उजाळा : आभार व्यक्त करताना गणेश पवार यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी 2003 ते 2010 पर्यंत रोटरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर 2010 ते 2017 पर्यंत किक बॉक्सिंग बेल्ट रेसलिंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम पाहिल्याचे सांगितले. तसेच 2003 ते 2017 पर्यंत सातारा जिल्ह्यातून अडीच हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांनी खेळाडू तयार केल्याचेही त्यांनी सांगितले.
उपस्थिती : कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल परीट यांनी केले. कार्यक्रमास पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व गणेश पवार मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
