रामकृष्ण वेताळ युवा मंच कराड उत्तर यांच्यावतीने सलग तिसऱ्या वर्षी आयोजन
कराड/प्रतिनिधी : –
श्रीराम मंदिर स्थापना दिवसानिमित्त कराड तालुक्यातील सुर्ली येथे रामायण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी ह.भ.प. सोनाली करपे, श्री क्षेत्र सद्गुरू कल्याण स्वामी संस्था, चकलंबा यांनी रामायण कथा सादर केली. अतिशय भक्तीमय वातावरणात त्यांनी रामायण कथा सादर करून सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
250 बाल वारकऱ्यांचा सहभाग : या रामायण कथेसाठी श्रीराम वारकरी संस्था, आरेवाडी येथील 250 बाल वारकऱ्यांनी सहभाग घेतला होता. ह. भ. प. गणेश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बाल वारकऱ्यांनी मृदंग वादन सादर केले. या मृदंग वादनाने श्रीराम भक्त तल्लीन झाल्याचे दिसून आले.
श्रीराम मंदिर स्थापना दिवस : आयोध्या येथील राम मंदिराच्या स्थापना दिवसानिमित्त रामकृष्ण वेताळ युवा मंच कराड उत्तर यांच्यावतीने या संगीतमय रामकथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास कराड तालुक्यासह कोरेगाव, खटाव, सातारा तालुक्यांतून रामभक्तांनी हजेरी लावली होती.

आबालवृद्ध व महिलांचा प्रतिसाद : सकाळी 8 ते सायंकाळी 10 वाजेपर्यंत विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांना अबालवृद्ध आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. रामायण कथेचे हे सलग तिसरे वर्ष आहे. दरवर्षी या कथेला मोठा प्रतिसाद लाभत आहे. या रामायण कथेमुळे संपूर्ण वातावरण चैतन्यमय बनले होते.
