वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर
कराड/प्रतिनिधी : –
पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्यावतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिले जाणारे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये सन २०२२-२३ या गळीत हंगामातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दक्षिण विभागात सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनासाठीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे कृष्णा कारखाना सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनात महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे.

उत्कृष्ट वाटचाल : साखर क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेद्वारे पुरस्कार जाहीर केले जातात. यंदाच्या पुरस्कारांची घोषणा संस्थेतर्फे नुकतीच करण्यात आली. गेली १० वर्षे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा कारखाना उत्कृष्ट वाटचाल करत आहे.
नफा निर्देशांकही उत्कृष्ट : कृष्णा कारखान्याने सन २०२२-२३ या गळीत हंगामात एकूण उत्पादन प्रक्रियेचा खर्च (६००.२० रुपये प्रति क्विंटल) हा राज्याच्या सरासरी साखरेच्या एकूण उत्पादन प्रक्रियेच्या खर्चापेक्षा (८०५.०४ रुपये प्रति क्विंटल) कमी ठेवत, उत्कृष्ट नफा निर्देशांक राखला आहे. तसेच कारखान्यातील साखरेचा प्रति क्विंटल रोखीचा उत्पादन प्रक्रिया खर्च (४४६.७९ रुपये प्रति क्विंटल) हा राज्याच्या सरासरी प्रति क्विंटल रोखीच्या उत्पादन प्रक्रिया खर्चापेक्षा (५४१.९२ रुपये प्रति क्विंटल) कमी आहे.
सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन : खेळत्या भांडवलावरील व्याजाचा खर्चदेखील (८३.१० रुपये प्रति क्विंटल) हा राज्याच्या सरासरी साखरेच्या प्रति क्विंटल खेळत्या भांडवलावरील व्याजाच्या खर्चापेक्षा (१०९.८० रुपये प्रति क्विंटल) कमी राखत, सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन केले आहे.
प्रगतशील कारभारावर शिक्कामोर्तब : या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत व्ही.एस.आय.ने सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनासाठीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कृष्णा कारखान्याला जाहीर केला आहे. या पुरस्कारामुळे कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नियोजनबद्ध, पारदर्शक व प्रगतिशील कारभारावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
पुरस्कार वितरण : मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, लवकरच या पुरस्कारांचे वितरण पुणे येथे केले जाणार आहे. या यशाबद्दल कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, शेतकरी सभासद, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
