बापूजी साळुंखे महाविद्यालयात गुरुवारी माजी विद्यार्थी मेळावा
कराड/प्रतिनिधी : –
येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय गुरुवार दिनांक १६ रोजी भव्य माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याला आजवर महाविद्यालयात शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी विद्यार्थी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
मुरलीधर मंदिरात संस्थेची स्थापना : शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांनी कराड येथे मुरलीधराच्या मंदिरात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. तर कराडात कृष्णा कोयना नदीच्या प्रीतिसंगमानजीक त्यांच्याच नावाने शहरात महाविद्यालय आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आजवर ते मैलाचा दगड ठरले आहे.
यशवंत :या विद्यालयातून आजवर ज्ञानार्जन करून अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यशस्वीरित्या कार्य करीत आहेत. या सर्वांचा एकत्रित संवाद व्हावा, यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन : गुरुवार (दि. १६) रोजी सकाळी १० वाजता विद्यालयाच्या प्रांगणात मेळाव्याचे उद्घाटन प्राचार्य डॉ. सतीश घाटगे यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रा. प्रमोद सुकरे व सर्व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
विद्यार्थी परिचय : त्यानंतरच्या सत्रात माजी विद्यार्थ्यांचा परिचय होणार आहे. दुपारी १ वाजता भोजन व त्यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘मुक्तांगण’ या सदरात विविध कलागुण सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. दुपारी ४ वाजता माजी प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील यांच्या उपस्थितीत समारोप समारंभ होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सतीश घाटगे असणार आहेत.
आवाहन : उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांना संयोजकांच्या वतीने एक आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांकडून
करण्यात आले आहे.