कराड/प्रतिनिधी : –
मकर संक्राती सणाच्या खरेदीचा मुहूर्त आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या 120 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमधील व्यवहार ज्ञानाच्या कौशल्याला उजळणी मिळावी या हेतूने टेंभू (ता. कराड) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बाल बाजाराचे आयोजन केले होते. या बाल बाजारामध्ये अंगणवाडीतील विद्यार्थीही सहभागी झाले होते. या बालबाजारात 100 पेक्षा अधिक बाल दुकानदारांनी आपले दुकान सजवले होते.
व्यवहारज्ञान : लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये व्यापाराची आवड निर्माण व्हावी. याचबरोबर नाणी नोटा, वजने मापे, लिटर, मीटर या सर्वांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, या हेतूने जिल्हा परिषद शाळांमध्ये बाल बाजाराचे आयोजन केले जाते. मुलेही या बाल बाजारामध्ये उत्साहाने सहभागी होतात. आणि आपल्या मालाची खरेदी विक्री करीत असतात.
दहा हजारांपेक्षा जास्त उलाढाल : या बाल बाजारामध्ये 10 हजार रुपयांपेक्षा जास्त उलाढाल झाली. चढाओढीने विक्री करणारी मुले पाहिली असता या मुलांमध्ये व्यापार विषयक कौशल्य रुजलेले पाहायला मिळाले.
मान्यवरांची भेट : या बाल बाजाराला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र सन्मुख, सरपंच रूपाली भोईटे, उपसरपंच शिवाजी साळुंखे, पोलीस पाटील रूबिना मुलाणी, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य यांनी भेटी दिल्या.
परिश्रम : बालबाजार यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वहिदा शेख, शिक्षक शरद पाटील, अरूणा डिसले, मनिषा गिरीगोसावी, शुभांगी हुलवान, अंगणवाडीच्या शिक्षिका छाया पारवे, सोनाली भुसारी, लता भुसारी, वर्षाराणी पाटील मदतनीस रोहिणी पाटील, मंगल भंडारे, सुनिता लेंगरे यांच्यासह गोपाळ गणेश आगरकर हायस्कूलच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन : शिक्षकांनी व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष देवाण-घेवाणी संदर्भात सुसंवाद साधून बालमांचा आनंद द्विगुणीत केला. या बाजारामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, खाऊ याचबरोबर किराणा दुकान, देशी अंडी, चायनीज यासारख्या वस्तू विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या. टेंभू गावातील ग्रामस्थांनी या बाल व्यापाऱ्यांना खरेदी करून मोठे प्रोत्साहन दिले.