पत्रकारितेतील सत्व आणि तत्व टिकवून ठेवा 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

बाळासाहेब पाटील; शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात पत्रकार सन्मान सोहळा उत्साहात 

कराड/प्रतिनिधी : – 

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या काळातील पत्रकारिता आणि सध्याची पत्रकारिता यामध्ये काळानुरूप अमुलाग्र बदल झाला आहे. आता सोशल माध्यमांबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्ता हेही पत्रकारिता क्षेत्रासमोरील मोठे आव्हान आहे. त्यामुळे बदलत्या समाजानुसार पत्रकारांकडून लोकांच्या अपेक्षाही वाढत असून पत्रकारांनीही पत्रकारिता करताना पत्रकारितेतील सत्व आणि तत्व टिकवून ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

पत्रकार सन्मान सोहळा : येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात सोमवारी (दि. 6) रोजी मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश घाडगे होते. यावेळी पत्रकारिता विभागप्रमुख प्रा. सौ. स्नेहलता शेवाळे-पाटील, प्रा. संभाजी पाटील, प्रा. जीवन आंबुडारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पत्रकारिता क्षेत्रात मोठी स्पर्धा : सध्या वृत्तवाहिनीसह सोशल माध्यमांमुळे पत्रकारिता क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली झाली असल्याचे सांगताना माजी मंत्री श्री पाटील म्हणाले, एखादी बातमी तात्काळ प्रसिद्ध करण्याच्या गडबडीत चुकीची माहिती जाण्याची शक्यता असते. अशावेळी बातमीची खातरजमा केल्याशिवाय ती समाजासमोर जाता कामा नये, याची काळजी पत्रकारांनी घ्यावी. असे सांगताना त्यांनी चुकीच्या वक्तव्यामुळे आणि पत्रकारांच्या साडेतोड लेखणीमुळे राज्याच्या राजकारणात आणि सत्ताकारणात झालेल्या उलथापलाथीची काही उदाहरणेही त्यांनी यावेळी दिली.

आरोग्याचीही काळजी घ्या : पत्रकारांनी शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या व्यथा, समस्या मांडाव्यात. यासोबत स्पर्धेच्या, धकाधकीच्या युगात काम करताना आपल्या आरोग्याची काळजीही घ्यावी, असेही श्री पाटील यांनी सांगितले.

वेगळा ठसा उमटवतील : शिवाजी विद्यापीठानंतर फक्त कराडमधील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात पत्रकारितेचं शिक्षण दिले जात असून या महाविद्यालयात तयार झालेले पत्रकार राज्य आणि देश पातळीवर आपला वेगळा ठसा उमटवतील, असे मतही श्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

लेखणी आणि चारित्र्य एकत्र यावे : अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश घाडगे म्हणाले, पत्रकारांच्या लेखणीचा कस लागतो, अशा शोध पत्रकारितेने मोठी उलथापालत होते. बाहेर घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब समाजात उमटते आणि समाजाचे प्रतिबिंब पत्रकारांच्या लेखणीतून वृत्तपत्रांत उमटते. त्यामुळे लेखणी आणि चरित्र एकत्र आल्यास पत्रकारांकडून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम होते. अशा पत्रकारितेची आज समाजाला खऱ्या अर्थाने गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

पत्रकारिता विभागाचा चढता आलेख : प्रास्ताविकात पत्रकारिता विभागप्रमुख प्रा. सौ. स्नेहलता शेवाळे-पाटील यांनी महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाचा चढता लेख सर्वांसमोर मांडला. तसेच या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले अनेक पत्रकार आज चांगल्या हुद्यावर कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. संभाजी पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. गायकवाड व प्रा. वाघमारे यांनी केले. 

सन्मान : प्रारंभी, डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन व उपस्थित सर्व पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला कराड व तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार, महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागातील प्रशिक्षणार्थी पत्रकार विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

योग्य काळाची आणि संधीची वाट पहा 

कोणत्याही क्षेत्रात काम करताना यश, अपयश येत राहते. परंतु, अपयशाने खचून जाऊ नका. काळाच्या उत्तरात अनेक गुपिते दडलेली असतात. त्यामुळे येणाऱ्या काळाची आणि योग्य संधीची वाट पहा, असे सूचक विधानही बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!