डॉ. अनिल देसाई; कराड हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिराचे उद्घाटन
कराड/प्रतिनिधी : –
हल्ली धकाधकीच्या जीवनात बहुतांश जणांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. शरीर आपल्याला वेळीच काही संकटांची पूर्वकल्पना देत असते. परंतु, किरकोळ गोष्ट समजून आपण त्याकडे काळजीपूर्वक पाहतच नाही. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने भविष्यात आपल्याला मोठ्या आरोग्य संकटाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे पैसा, धनदौलत, पद, प्रतिष्ठा यांपेक्षा निरोगी आरोग्यासारखी मोठी संपत्ती नाही, असे प्रतिपादन कराड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे चेअरमन डॉ. अनिल देसाई यांनी केले. तसेच निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
आरोग्य शिबिर : येथील कराड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरतर्फे लोकांचे आरोग्य सुदृढ रहावे, त्यांच्यात आरोग्याबाबत जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने सन 2025 या नवीन वर्षांत आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार शनिवार (दि. 4) रोजी सकाळी झालेल्या पहिल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. अनिल देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉ. संदीप पाटील, डॉ. योगेश निकम, डॉ. जयवंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
60 जणांनी घेतला लाभ : सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत झालेल्या या आरोग्य शिबिराचा एकूण 60 जणांनी लाभ घेतला. दरम्यान, या आरोग्य शिबिरासाठी 42 रुग्णांनी पूर्व नोंदणी केली होती. त्यानुसार रुग्णांचा पूर्व आरोग्य इतिहास पाहून त्यांची वर्गवारी करण्यात आली. तसेच रुग्णांमध्ये आढळणाऱ्या लक्षणांवरून संबंधित विभागांच्या वैद्यकीय तज्ञांकडून त्यांची तपासणी करून त्यांना मोलाचे मार्गदर्शनही करण्यात आले.
तपासण्या व मार्गदर्शन : या शिबिरामध्ये रक्त, लघवी, साखर, एक्स-रे, ईसीजी, डोळे तपासणी, हाडांची तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. यात तीन रुग्णांची रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level – BSL) तपासण्यात आली. आवश्यकतेनुसार तीन रुग्णांचे एक्स-रे काढण्यात आले. तर तीन रुग्णांची ईसीजी तपासणीही करण्यात आली. तसेच तीन रुग्णांना हाडांच्या आजारांबाबत तज्ञांकडून योग्य सल्लाही देण्यात आला. एकूण 60 जणांची अस्थिग्रंथांची तपासणी व 50 जणांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.
शस्त्रक्रिया : तसेच तपासणी दरम्यान, एका रुग्णामध्ये आढळलेल्या काही आरोग्य लक्षणांवरून त्याच्यावर सामान्य शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे लक्षात आले. त्यानुसार पुढील आरोग्य शिबिरात शनिवार (दि. 11) रोजी ही शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे डॉ. देसाई यांनी सांगितले.
मोलाचे परिश्रम : हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. अनिल देसाई, तसेच संचालक डॉ. संदीप पाटील, डॉ. योगेश निकम, डॉ. जयवंत पाटील, हॉस्पिटलच्या प्रशासक डॉ. नम्रता पत्की यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
उत्स्फूर्त प्रतिसाद : एकंदरीत या आरोग्य शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच रुग्णांना मिळालेल्या तत्पर सेवेबद्दल, तसेच तपासणी आणि औषधांवर मिळालेल्या विशेष सवलतीबद्दल रुग्णांनी समाधान व्यक्त केले.
‘रुग्णसेवा ही ईश्वरसेवा’, समजून कराड हॉस्पिटलतर्फे सामाजिक बांधिलकी जोपासत वर्षभरात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यानुसार लोकांमध्ये आरोग्य जागृती करण्यासाठी नववर्षानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या पुढील वर्षभरातील सर्व आरोग्य शिबिरांमध्येही रुग्णांना अशाच प्रकारे तत्पर सेवा देत विविध तपासण्या आणि औषधांवर सवलत देण्यात येणार आहे.
– डॉ. अनिल देसाई
(चेअरमन, कराड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, कराड)