प्रदीपदादा रावत; पहिली बंधुता परिषद कराडमध्ये उत्साहात
कराड/प्रतिनिधी : –
‘सकल हिंदू, बंधू बंधू’ या मंत्रावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संविधानात बंधुत्वाचा उल्लेख केला असून त्यांना अभिप्रेत असलेल्या बंधुत्वाचा प्रचार संघ करत आहे. आज खरे राष्ट्रवादी, समाजक्रांतिकारक
बाबासाहेब, सावरकर आणि शाहू महाराज बहुजन समाजापर्यंत पोहोचवले पाहिजेत. बाबासाहेबांनी घटना निर्मितीवेळी, तसेच हिंदू कोड बीलावेळी सकल हिंदू समाजाचा विचार केला. किंबहुना एकवर्णीय हिंदू समाज निर्माण करण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रयत्न होता, असे प्रतिपादन बंधुता परिषदेचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीपदादा रावत यांनी केले.
बंधुता परिषद : कराड शहराच्या सोमवार पेठेतील भवानी मंदिर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या भेटीला 2 जानेवारी 2025 रोजी 85 वर्षे पूर्ण झाली. या भेटीच्या स्मृतीप्रित्यर्थ लोककल्याण मंडळ ट्रस्ट, कराडतर्फे करण्यात आलेल्या पहिल्या बंधुता परिषदेत मार्गदर्शन करताना अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
भावकी एक करूया : इतिहासाच्या सागरातून कोळसा उघडायचा की चंदन हे आपण ठरवले पाहिजे. आपली गावकी एक आहे. पण भावकी सुद्धा एक झाली पाहिजे, असे आवाहनही श्री रावत यांनी केले.
परिसंवाद : या परिषदेतील परिसंवादामध्ये आंबेडकरी विचारवंत ॲड. क्षितिज टेक्सास गायकवाड, दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे, बौध्द युवक संघटनेचे अध्यक्ष ॲड. विजय गव्हाळे यांनी आपले विचार व्यक्त केले.
वैचारिक अस्पृश्यता संपवा : सावरकरांचे हिंदुत्व आणि बाबासाहेबांची बंधुत्वता एकत्र आणायची असेल, तर आधी वैचारिक अस्पृश्यता संपवली पाहिजे, असे सांगताना क्षितिज गायकवाड म्हणाले, अखंड भारताच्या निर्मितीत सावरकर आणि आंबेडकरांची भूमिका फार नितळ होती. त्यात आंबेडकर पुढे होते. त्यांच्यानंतर संपूर्ण भारतात बंधुत्वाची भावना रुजविण्याचे काम डॉ. केशवराव हेडगेवार यांनी संघाच्या माध्यमातून केले असल्याचे सांगितले.
ढोंगी पुरोगाम्यांपासून देश वाचवा : लहानपणापासून गावात अस्पृश्यतेचे चटके सोसले असल्याने मी बंधुतेच्या शोधात असल्याचे सांगताना प्रा. मच्छिंद्र सकटे म्हणाले, सुरुवातीच्या जीवनात तथाकथित पुरोगामी, विद्रोही लोकांनी आणि डाव्या विचारवंतांनी माझी दिशाभूल केल्याचे अनुभव मला आले. ढोंगी पुरोगाम्यांपासून दलित समाज आणि संपुर्ण देश आपण वाचवायला हवा. जातीभेद नष्ट करून बंधुता निर्माण करण्यासाठी आम्ही संघाच्या सोबत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बाबासाहेबांनी इस्लामचा धोका सांगितला होता : देशाच्या फाळणीवेळी सुद्धा बाबासाहेबांनी इस्लामचा धोका वारंवार सांगितला होता, असे सांगत ॲड. विजय गव्हाळे म्हणाले, बाबासाहेबांनी फाळणीविषयी कठोर भूमिका मांडली होती. त्यावर तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने आज बांगलादेशात हिंदू, बौद्ध बांधवांवर अत्याचार होताहेत. कलम 370 सारख्या विषयात सुद्धा बाबासाहेबांनी घेतलेल्या राष्ट्रनिष्ठ भूमिकेमुळेच आज भारत सरकार ते कलम हटवू शकले. धर्म परिवर्तन करत असताना त्यांनी भारतीय परंपरेतील बौध्द धर्मच का स्वीकारला, याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. बंधुतेसाठी हिंदू समाजाने डॉ. आंबेडकर समजून घेतले पाहिजेत, असे सांगत आज बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या बंधुत्वाची देशाला खूप गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
हिंदु दलित संगम : प्रास्ताविकात श्री आमादापुरे यांनी कृष्णा आणि कोयनेच्या संगमावर आज हिंदु व दलित या दोन विचारांचाही संगम होत असून हा संगम अधिक दृढ व व्यापक होत जाईल, अशी आशा व्यक्त केली.
मान्यवरांची उपस्थिती : परिषदेची सुरुवात प्रतिमा व संविधान पूजन, तसेच बुद्ध वंदनेने झाली. कार्यक्रमाचे संयोजन लोककल्याण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विजय जोशी यांनी केले. सूत्रसंचालन वैभव डुबल, तर परिसंवादाचे संचालन निलेश अलाटे यांनी केले. श्रीकांत एकांडे यांनी आभार मानले. यावेळी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, विक्रम पावसकर, भरतनाना पाटील, रामकृष्ण वेताळ, सागर आमले, माजी नगरसेवक सौरभ पाटील, सुहास जगताप, घनशाम पेंढारकर, रणजीत नाना पाटील, प्रकाश वायदंडे या प्रमुख मान्यवरांसह विविध चळवळीतील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
ब्राह्मणच जातीयवादाचे बळी
दलितांवर ब्राह्मणांनी, तसेच संघ आणि भाजपने अन्याय केला, असे लोकांच्या मनात तथाकथित पुरोगामी विचारसरणीच्या लोकांनी बिंबवले. मात्र, खऱ्या अर्थाने दलितांवर अन्याय ब्राह्मणांनी नव्हे, तर पुरोगामी विचारसरणीच्या लोकांनीच केला आहे. त्यामुळे ब्राह्मणच जातीयवादाचे खरे बळी ठरले असून त्यांना गावेच्या गावे का सोडावी लागली? यावरून ते स्पष्ट होते, असे मत प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी व्यक्त केले. तसेच ब्राह्मण – दलित एक होऊ शकतात, हे या परिषदेच्या माध्यमातून दाखवून दिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना यावेळी केले.
गांधीजींना महात्मा मानतच नाही
बाबासाहेबांचे ब्राह्मण्यवादी विचार सखोल होते, ते जातीवादी नव्हते. परंतु, काँग्रेस विचारसरणीच्या लोकांनी समाजात संघ म्हणजे ब्राह्मण्यवाद, मनुवाद असे बिंबवले. जी. एम. सहस्रबुद्धे यांनी मनुस्मृतीची पहिली प्रत जाळली होती. त्याला गांधींनी विरोध केला होता. त्यामुळे खरे विरोधक कोण? हे पाहिले पाहिजे. अशाच मनुवाद्यांनी, तसेच गांधी घराण्याने आंबेडकरांना खूप त्रास दिला. त्यामुळे बाबासाहेबही गांधींना महात्मा मानत नव्हते. आपणही त्यांना महात्मा मानतच नाही, असे विधान ॲड. विजय गव्हाळे यांनी केले.
हेडगेवार आणि आंबेडकरांची कराड शाखेस भेट
कराडमधील कमळेश्वराच्या देवळात संघाची पहिली शाखा होती. त्यानंतर येथील टिळक हायस्कूलच्या मैदानावर असलेल्या संघ शाखेस डॉ. केशवराव हेडगेवार यांनी भेट दिली होती. कराड नगरपालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एका सन्मान समारंभासाठी निमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी भवानी मंदिर मैदानावरील संघाच्या शाखेत भेट दिली. याप्रसंगी त्यांनी संघाकडे मी आपुलकीने पाहतो, असे म्हटले होते. त्याअर्थाची बातमीही त्याकाळी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याचा दाखला केदार गाडगीळ यांनी दिला.