कराड/प्रतिनिधी : –
येथील कराड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरतर्फे वर्षभरात विविध उपक्रम व आरोग्य शिबिरे राबविण्यात येतात. त्यानुसार लोकांचे आरोग्य सुदृढ रहावे, त्यांच्यात आरोग्याबाबत जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने सन 2025 या नवीन वर्षांत आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये सवलतीच्या दरात विविध तपासण्या, औषधे व तज्ञांतर्फे मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती कराड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे चेअरमन डॉ. अजित देसाई यांनी दिली.
पत्रकार परिषद : या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. जयवंत पाटील व हॉस्पिटलच्या प्रशासक डॉ. नम्रता पत्की यांची उपस्थिती होती.
समाजाचे आरोग्य चांगले रहावे : या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देताना डॉ. देसाई म्हणाले, सध्या लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली भिन्न असून लोकांचे आरोग्याकडे लक्ष कमी असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रत्येकाने आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्ती निरोगी असावी, समाजाचे आरोग्य चांगले रहावे, या दृष्टीने कराड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार हॉस्पिटलच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम, आरोग्य शिबिरे, मोफत तपासणी, महिला शिबिरे घेतली जातात.
सूचनांचे पालन होत नाही : एक दिवसीय शिबिरात सर्व रुग्णांच्या विविध तपासण्या, औषधे मार्गदर्शन व तज्ञांचे सल्ले या गोष्टी पूर्णत्वास जात नसल्याचे सांगत डॉ. देसाई म्हणाले, तसेच रुग्णांना दिलेल्या सूचनांचे पालनही त्यांच्याकडून होताना दिसत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन 2025 या नवीन वर्षात आठवड्यातील प्रत्येक शनिवारी (52 शनिवार) आरोग्य शिबिरे घेण्यात येणार आहेत.
डोक्याच्या केसापासून, पायाचे नखापर्यंत तपासण्या : या शिबिरांमध्ये रुग्णाच्या डोक्याच्या केसापासून ते पायाचे नखापर्यंत सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. तसेच रुग्णांचा यापूर्वीचा आरोग्य इतिहास लक्षात घेऊन तपासण्या करण्यात येतील.
30 ते 50 टक्क्यांपर्यंत सवलत : यामध्ये ब्लड प्रेशर, साखर, रक्त तपासणी, मेंदू विकार, डोळ्यांचे विकार, हाडांचे विकार, हृदयविकार यासह अन्य तपासण्या करण्यात येणार आहेत. यामध्ये विविध तपासण्या व औषधांमध्ये 30 ते 50 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर तज्ञांकडून देण्यात येणाऱ्या मार्गदर्शनासाठी 50 टक्क्यांपर्यंत सवलत रुग्णांना मिळणार आहे. तसेच सिटीस्कॅन, सोनोग्राफी आदी सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नसल्यास अन्य हॉस्पिटलमध्ये या तपासण्यांवर रुग्णांना 25 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे.
नाव नोंदणीसाठी संपर्क करा : नवीन वर्षाच्या पहिल्या शनिवारी, दि. 4 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हे शिबिर घेण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी 9322966868 या क्रमांकावर संपर्क करून आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन करत नाव नोंदणीसाठी 50 रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याचे डॉ. अजित देसाई यांनी सांगितले.