स्व. जयमाला भोसले यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त आयोजन; महिलांचा उदंड प्रतिसाद
कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांच्या सुश्राव्य वाणीतून उलगडत जाणारे संत तुकाराम महाराज यांच्या शिकवणीचे मर्म आणि त्यांच्या जोडीला सुप्रसिद्ध गायिका सौ. सन्मिता धापटे-शिंदे यांचे सुरेल भक्तीगीत गायन; यातून निर्माण झालेल्या भक्तिरसात कराड येथील रसिक न्हाऊन गेले. निमित्त होते; कृष्णा सरिता महिला बझारच्यावतीने आयोजित ‘तुका आकाशा एवढा’ भक्तिमय संगीत सोहळ्याचे.
जयंतीनिमित्त आयोजन : कृष्णा परिवाराच्या आधारस्तंभ स्व. जयमाला जयवंतराव भोसले यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त कृष्णा विश्व विद्यापीठाच्या सभागृहात संत तुकाराम महाराजांचे जीवनचरित्र व त्यांच्या अभंगाद्वारे सद्य सामाजिक स्थितीवर भाष्य करणाऱ्या ‘तुका आकाशा एवढा’ या भक्तीमय संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.












