आ. डॉ. अतुलबाबा भोसले;पाटण कॉलनीतील पुनर्वसनाचे आश्वासन पूर्ण करणार
कराड/प्रतिनिधी : –
शहरातील पाटण कॉलनीत झोपडपट्टी परिसराची पाहणी करुन, डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या झोपडपट्टीच्या पुनर्वसनाबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश नगरपालिका प्रशासनाला दिले. हा प्रस्ताव पुढील आठवड्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करुन आणण्याची ग्वाही आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.
अहवाल देण्याचे निर्देश : विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी निवडून आल्यानंतर पाटण कॉलनीतील झोपडपट्टीचा प्रश्न मार्गी लावण्याचे अभिवचन दिले होते. त्यानुसार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी तातडीने शासकीय विभागांची आढावा बैठक घेऊन, कराड दक्षिणमधील सर्वच झोपडपट्टींच्या पुनर्वसनाबाबत सविस्तर अहवाल देण्याचे निर्देश दिले होते.
बैठक : बुधवारी आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाटण कॉलनी येथील झोपडपट्टी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत, इथल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
पक्क्या घरांपासून लोकांना वंचित ठेवले : गेल्या 50 वर्षांपासून आपल्याला पक्क्या घरांपासून वंचित ठेवण्यात आल्याचे सांगत आ. डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, या बैठकीच्या निमित्ताने आपण सर्व झोपडपट्टीधारकांना पक्की घरे देण्याची मूहूर्तमेढ करत आहोत. येत्या 10 दिवसांत याबाबतचा प्रस्ताव नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करुन घेण्याची जबाबदारी माझी राहील. विधानसभा निवडणुकीत जो शब्द दिला तो पाळून लवकरच सर्वांना पक्की घरे देण्याबाबतची कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मान्यवरांची उपस्थिती : कराडचे मुख्याधिकारी शंकर खंदारे, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, माजी नगरसेवक आप्पा माने, सुहास जगताप, घनश्याम पेंढारकर, महादेव पवार, उमेश शिंदे यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकांना हक्काची घरे देण्यास प्राधान्य
कराड शहरातील पाटण कॉलनीत गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ अनेक लोकांना झोपडपट्टीत राहावे लागत आहे. या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावून, त्यांना हक्काची घरे मिळवून देण्यास कराड दक्षिणचे नूतन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्राधान्य दिले आहे.