आ. डॉ. अतुलबाबा भोसले; भाऊंच्या आठवणींना दिला उजाळा
कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्रातील थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) यांनी कराड मतदारसंघाचे दीर्घकाळ नेतृत्व केले आहे. त्यांच्यानंतर तब्बल 39 वर्षांनंतर रेठरे बुद्रुकला माझ्या रूपाने विधानसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे स्व. भाऊंच्या विचारांचा वारसा जपत कराड दक्षिणच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्यरत राहणार असल्याची ग्वाही आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.
निवासस्थानी भेट : स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) यांच्या रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील निवासस्थानी कराड दक्षिण विधानसभेचे नूतन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सर्वांशी मनमोकळा संवाद साधत, भाऊंच्या आठवणींना उजाळा दिला.
महाराष्ट्राच्या राजकारणाला विधायक दिशा : थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) यांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या पहिल्या मंत्रीमंडळात मंत्रीपद भूषविले. इतकेच नव्हे तर त्यांनी दीर्घकाळ कराड मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना, महाराष्ट्राच्या राजकारणाला विधायक दिशा देण्याचे काम केले.
अभिवादन : प्रारंभी, आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करत, त्यांच्या पवित्र स्मृतींना त्यांनी वंदन केले. यावेळी कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी आ.डॉ. भोसले यांचे स्वागत केले.
मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी माजी आमदार भगवानराव साळुंखे, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, सुदन मोहिते, सरपंच हणमंत सूर्यवंशी, कृष्णा कारखान्याचे संचालक संजय पाटील यांच्यासह मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.