सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी दादासाहेब मोकाशी यांनी कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून मोठे शैक्षणिक दालन खुले केले. सर्वसामान्यांमधून वर आलेले व्यक्तिमत्व असल्याने त्यांनी नेहमी सहकार्याची भूमिका जोपासल्याचे सांगत दादासाहेब मोकाशी यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन आमदार मनोज घोरपडे यांनी केले.
अमृतमहोत्सवी जयंती सोहळा :राजमाची (ता. कराड) येथे शिक्षणमहर्षी दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलात मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे संस्थापक दादासाहेब उर्फ भगवानराव मोकाशी यांच्या 75 व्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी, सचिव अभिजीत मोकाशी, भाजपचे प्रदेश सचिव भरत पाटील, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब कदम, कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील, निवृत्ती पोलीस अधिकारी डी. बी. पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस, उद्योगपती राजेंद्र शेलार, रयत क्रांतीचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिन नलवडे, महाविद्यालयाचे संचालक विलास चौधरी, प्राचार्य ए. एस. ढाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृषी क्षेत्रावर निष्ठा : दादासाहेब मोकाशी यांना वीस वर्षांपूर्वी एखादे मेडिकल कॉलेज काढता आले असते. परंतु, कृषी क्षेत्रावरील निष्ठेतून त्यांनी कृषी महाविद्यालयाचे रोपटे लावल्याचे सांगत आमदार श्री. घोरपडे म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रात त्यांना फार मोठा कालावधी मिळाला नाही. मात्र, त्यांनी उभारलेल्या या संकुलात आज 19 प्रकारच्या विविध कोर्सेसच्या माध्यमातून विद्यार्थी ज्ञानार्जन करत असून भविष्यात हेच विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी म्हणून नावलौकिक मिळतील. दादासाहेब मोकाशी यांना कुस्ती क्षेत्रातही फार आवड होती. त्यांनी अनेक स्पर्धांचे आयोजन करून ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
संस्थेच्या कार्याचा गौरव :आज आपण कितीही संपत्ती कमावून ठेवली; तरी ती चिरकाल टिकेल, याची कोणीही शाश्वती देऊ शकत नसल्याचे सांगत आमदार श्री. घोरपडे म्हणाले, मुलांमध्ये चांगल्या प्रकारचे कौशल्य निर्माण करून दिल्यास ते अर्थार्जनासह सामाजिक जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडू शकतील. त्यानुसार एक जबाबदार नागरिक व भावी पिढी घडवण्याचे काम दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलामार्फत होत असल्याचे सांगत आमदार श्री. घोरपडे यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला. तसेच या महाविद्यालयास आपण केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून लागेल ती मदत करू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
मोठे कर्तुत्व : केवळ कृषी महाविद्यालय उभे करण्याइतपत दादासाहेब मोकाशी यांचे कर्तृत्व मर्यादित नसल्याचे सांगत राजेंद्र शेलार म्हणाले, मुंबईत इंजिनिअरिंग कॉलेजचे जाळे विणले गेले; त्यावेळी पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेजची निर्मिती झाली. यामध्ये दादासाहेबांचे मोठे योगदान होते. त्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातील मुलांसाठी कराडला कृषी महाविद्यालय सुरू केले. बारामती कृषी विद्यापीठानंतर महाराष्ट्रात मोकाशी कॉलेजची गणना होते. आज दादासाहेबांचे अपूर्ण स्वप्न त्यांच्या पश्चात त्यांची दोन्ही मुले पूर्ण करत असून वडिलांचा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून करत आहेत.
राज्यकर्त्यांनी विचार करावा :कृषी महाविद्यालयाशी संलग्न आज अनेक शाखा निर्माण झाल्या असल्याचे सांगत श्री. शेलार म्हणाले, यासाठी डोंगरी भागात पर्यटन आणि सकल भागात कृषी विकास करायला मोठी संधी आहे. त्यादृष्टीने उद्योग निर्माण करता येतील, याचा राजकर्त्यांनी विचार करायला हवा. त्यासाठी कृषी क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. कृषी आधारित नवनवीन योजना शेतकऱ्यांना द्यायला हव्यात. तसेच कृषी महाविद्यालयांमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाताला काम कसे देता येईल, यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सचिन नलावडे यांनी मनोगत व्यक्त केले.
अभिवादन व दिनदर्शिका प्रकाशन : प्रारंभी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दादासाहेब मोकाशी यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन केले. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या 2025 सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयात आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेस मान्यवरांनी भेट दिली. कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, तसेच स्पर्धेसाठी बाहेरून आलेल्या शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक अधिकारी निर्माण व्हावेत
कृषी क्षेत्राने आज 50 टक्क्यांपेक्षा जास्त प्रशासकीय अधिकारी दिले आहेत. मोकाशी कॉलेजही अधिकारी बनवण्याचा कारखानाच आहे. येथील विद्यार्थ्यांनी यूपीएससी, एमपीएससीच्या माध्यमातून यशाला गवसणी घालावी. शेती हे सर्वात जास्त रोजगार मिळवून देणारे क्षेत्र आहे. त्यामुळे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज आहे. महाविद्यालयातून बाहेर पडणारे विद्यार्थी आधुनिक शेतीची कास धरून शेती क्षेत्रात एक नवा विक्रम घडवतील, असा विश्वासही आमदार श्री. घोरपडे यांनी व्यक्त केला.