शेतकऱ्यांच्या हस्ते औपचारीक उद्घाटन; चार दिवस चालणार कृषीचा जागर
कराड/प्रतिनिधी : –
शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने भरविण्यात येणारे 19 वे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन उद्या शुक्रवारपासून खुले होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे यांनी दिली.

चार दिवसात कृषीचा जागर : या प्रदर्शनात शुक्रवारपासून 10 डिसेंबर या चार दिवसात कृषीचा जागर पहायला मिळणार आहे. कमी कालावधीत बाजार समितीने शासन कृषी विभाग व सह यंत्रणांच्या मदतीने प्रदर्शनाची तयारी पूर्ण केली आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये शेती, औद्योगिक व पशुपक्षी, महिला बचतगट, आरोग्य या क्षेत्रातील पर्वणी पहायला मिळणार आहे.
स्व. विलासकाकांची संकल्पना : माजी सहकार मंत्री (कै.) विलासराव पाटील – उंडाळकर यांच्या संकल्पनेतून या प्रदर्शनाची 18 वर्षापूर्वी मुहूर्तमेढ रोवली गेली. आजतागायत अखंडपणे हे प्रदर्शन भरवले जात आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (स्व.) यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी 24 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत प्रदर्शन भरवण्याची परंपरा आहे. परंतु, यंदा या कालावधीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुका असल्याने आचारसंहितेमुळे प्रदर्शनाच्या वेळेत बदल करण्यात आला.

दिमाखदार मंडप : बदललेल्या तारखेनुसार उद्या शुक्रवारपासून हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले होत असून, शेती उत्पन्न बाजार समिती, शासन कृषी विभाग व जिल्हा परिषद, सातारा आदींच्या मार्गदर्शनाखाली डायनॅमिक इव्हेंटचे धीरज तिवारी यांच्या यंत्रणेने स्वा. सै. शामराव पाटील फळे व भाजीपाला (बैल बाजार) आवारात दिमाखदार मंडप उभा केला आहे.













