प्रा. वसंत हंकारे; बेलवडेत “बाप समजून घेताना” विषयावर व्याख्यान उत्साहात
कराड/प्रतिनिधी : –
“मायबापे केवळ काशी, तेणे न जावे तीर्थासी” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत केवळ तीर्थाटन करून देव शोधण्यापेक्षा आई – वडिलांच्या कष्टाची जाणीव होण्यासाठी प्रत्येकाला आधी आपले आई – वडील आणि त्यांचे देवत्व कळले पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते, समाजरत्न प्रा. वसंत हंकारे यांनी केले.

व्याख्यान : बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या ब्रह्मदास विद्यालयात सोमवार, दि. 2 रोजी ‘बाप समजून घेताना…’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक एस. वाय. माने, सरपंच डॉ. सुशांत मोहिते, शिवाजीराव मोहिते, भगवान मोहिते, अंकुश मोहिते, विजय जाधव, प्रमोद मोहिते, गणेश वाहगावकर, सागर मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
संभाजीराजांना त्यांचा बाप कळला : मरणयातना सोसूनही औरंगजेबासमोर न झुकणाऱ्या संभाजीराजांना त्यांचा बाप कळला होता, असे सांगत प्रा. हंकारे म्हणाले, तुम्हा – आम्हाला आपला बाप कळला आहे का? हे प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारावे. तुम्हाला स्वतःचे चांगले भविष्य घडवायचे असेल, एक चांगला माणूस आणि जबाबदार नागरिक व्हायचे असेल, तर आपल्यासाठी राब राब राबणाऱ्या आई – वडिलांच्या कष्टाची नेहमी जाणीव ठेवा.













