कराड/प्रतिनिधी : –
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये सलग 25 वर्षे आमदार असलेल्या माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वर्चस्वाला तडा देत भाजपने मोठा विजय प्राप्त करत मतदारसंघात प्रथमच कमळ फुलवले. या विजयाने गेल्या कित्येक वर्षांपासून निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. सांघिक प्रयत्नामुळे हे यश मिळाल्याचे निकालावरुन दिसत आहे.
शेवटचे कमळ : 1995 मध्ये कराड उत्तर मतदारसंघाच्या मतपत्रिकेमध्ये कमळाचे चिन्ह शेवटचे पाहायला मिळाले होते. यानंतर कित्येक वर्ष या मतदारसंघातून हे चिन्ह गायब होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत हे चिन्ह मतपत्रिकेवर पुन्हा आले. मनोज घोरपडे, धैर्यशील कदम व रामकृष्ण वेताळ यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात कमळाने इतिहास घडवला.
तिरंगी लढतीमुळे अपयश : कराड उत्तर हा माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचा अभेद्य किल्ला, अशी या मतदारसंघाची महाराष्ट्रभर ओळख आहे. या मतदारसंघात सलग पाच टर्म आमदार असलेल्या बाळासाहेब पाटील यांची एकहाती सत्ता होती. विधानसभेला अनेकदा झालेली तिरंगी लढत त्यांना यश मिळवून देत होती. त्यामुळे या ठिकाणी भाजप व मित्र पक्षांना अपयश येत होते.
कमळामुळे विजय : भाजपचे जेष्ठ नेते स्व. राजाभाऊ देशपांडे यांनी 1995 मध्ये आणि प्रदीप अधिकराव 2004 मध्ये कमळ चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना यश आले नव्हते. यंदा उत्तरेत मतपत्रिकेवर कमळ चिन्ह अवतरले आणि विजयही प्राप्त केला.
एकास एक लढतीचा फायदा : कमळ चिन्ह आणि पक्ष तळागाळातील मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचे आ. मनोज घोरपडे, युवा नेते रामकृष्ण वेताळ व जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी कष्ट घेतले होते. या निवडणुकीत तिरंगी लढत न होता, एकास एक लढत होईल, याची खबरदारी भाजप श्रेष्ठींनी घेतली होती. रामकृष्ण वेताळ आणि धैर्यशील कदम यांनी माघार घेऊन स्वःतच्या तालुक्यातून मोठे मताधिक्य दिले असून या विजयात रामकृष्ण वेताळ यांचा सिंहाचा वाटा आहे.
सर्व ताकद पणाला : आ. मनोज घोरपडे यांना मतदान करण्यासाठी रामकृष्ण वेताळ आणि धैर्यशील कदम यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. आपली सर्व ताकद त्यांच्या विजयासाठी लावली. त्यांचे प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे उत्तरचा बालेकिल्ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वातून बाहेर निघाला आणि अशक्य असे काम सहज होऊन कराड उत्तरेच्या मतपत्रिकेवर कमळ चिन्ह अवतरले, जिंकले आणि मनोज घोरपडे विधानसभेत पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे.
रामकृष्ण वेताळ यांची खंबीर साथ
साडेचार जिल्हा परिषद गट आणि दीड लाख मतदार असलेल्या कराड तालुक्याने मनोज घोरपडे यांना भरघोस मताधिक्य दिले आहे. यासाठी आ. मनोज घोरपडे आणि त्यांना लाभलेली रामकृष्ण वेताळ यांची खंबीर साथ विजयात मोलाची ठरली. वेताळ यांची तरूण वर्गात असलेली क्रेझने तरूणांचा प्रतिसाद वाढवला आहे. कराड उत्तरच्या विजयात रामकृष्ण वेताळ यांचा वाटा सिंहाचा आहे. तरुणाईकडून उत्तरेचे रामकृष्ण वेताळ किंगमेकर असल्याचा किताब मिळत आहे.