42 वर्षांनी पुन्हा जिव्हाळ्याचा क्षण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

मैत्रीचा अमृतमहोत्सव; न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

कराड/प्रतिनिधी : –

न्यू इंग्लिश स्कूल तांबवे (ता. कराड) येथील इ. 10 वी 1982 बॅचचा स्नेहमेळावा नुकताच हळव्या आठवणींनी भारावून पार पडला. 42 वर्षांनंतर पुन्हा एकत्र येण्याचा आनंद आणि आठवणींच्या ओलाव्याने वातावरण भारावून गेले होते. हा स्नेहमेळावा आयोजित करण्यासाठी उंब्रज केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ. सुनंदा पाटील, तांबवेतील प्रसिद्ध दुकानदार वल्लीसो संदे आणि प्रगत शेतकरी भास्कर वरकड यांनी विशेष पुढाकार घेतला.

जुने चेहरे पुन्हा एकत्र : मैफिलीला 40 माजी विद्यार्थी आणि 15 शिक्षकांनी उपस्थिती लावली. जुने चेहरे पुन्हा एकत्र पाहून डोळ्यांत आठवणींचे भाव दाटून आले होते. अध्यक्षस्थानी शाळेचे माजी मुख्याध्यापक एम. जे. पाटील होते. विशेष म्हणजे 85 वर्षांचे चव्हाण सर देखील या कार्यक्रमासाठी हजर राहिले. त्यांनी आपल्या मनोगतात म्हटलं, “मैत्रीची ही भेट माणसांना जोडणारी आणि आपलं जीवन समृद्ध करणारी आहे.”

निरोगी जीवनशैलीचा मूलमंत्र : या कार्यक्रमात सूर्यवंशी सरांनी “शरीर हीच खरी संपत्ती आहे” या विचाराने निरोगी जीवनशैलीचा मूलमंत्र दिला. गायकवाड सरांनी त्यांच्या सुंदर कवितेतून मैत्रीचे महत्त्व उलगडून दाखवलं. “आम्ही शिक्षक होतो; पण तुम्ही विद्यार्थी आमचं खरं अभिमानस्थान आहात,” या शब्दांनी त्यांनी सर्वांना भावुक केलं.

गमती-जमतींना उजाळा : माजी विद्यार्थ्याने आपली ओळख नव्या अनुभवांनी आणि आठवणींनी साजरी केली. शाळेतील गमती-जमतींना उजाळा देत हास्यकल्लोळ माजला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट बाबर यांनी अत्यंत दिलखुलास शैलीत केलं.

मान्यवरांचे मनोगत : प्रा. राजेंद्र वाडते, प्रा. विकास वाडते, पोलिस निरीक्षक अनिल कारंडे, केंद्रप्रमुख सौ. सुनंदा पाटील, हणमंत पाटील यांसह इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्या शब्दांमधून शाळेच्या आठवणींना नवसंजीवनी मिळाली.

‘कभी अलविदा ना कहना : शाळेचे माजी मुख्याध्यापक अवघडे सर यांनी आभार मानले. प्रा. राजेंद्र वाडते यांच्या भावपूर्ण ‘कभी अलविदा ना कहना’ या गाण्याने कार्यक्रमाचा समारोप झाला. गाण्याच्या शब्दांमध्ये दडलेला जिव्हाळा प्रत्येकाच्या मनाला भिडला.

गप्पांचा फड : कार्यक्रमानंतरही गप्पांचा फड रंगला. जुन्या आठवणी आणि नव्या गोष्टींच्या धाग्यांनी मैत्रीचा हा सोहळा अधिकच गोड झाला. “आता दरवर्षी असाच स्नेहमेळावा करायचा!” या निर्धाराने सर्वांनी निरोप घेतला. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!