महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला आणि गुजरातचे ईव्हीएम महाराष्ट्रात?

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आ. रोहित पवार; महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी जनतेत जाणार

कराड/प्रतिनिधी : –

ईव्हीएम बाबतची भूमिका नक्कीच संसयास्पद आहे. संख्याबळ 160 च्या पुढे कसे गेले, याचे भाजपच्या लोकांनाही आश्चर्य वाटत असेल. कुणाल पाटील यांना त्यांच्या राहत्या गावात एकही मत मिळाले नाही, हे आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जातात आणि गुजरातची ईव्हीएम महाराष्ट्रात येतात. त्यामुळे त्यात काहीतरी घोळ
असून महाराष्ट्रातील बऱ्याच उमेदवारांचे मताधिक्य जवळपास सारखेच कसे काय? अशा आमच्या अनेक प्रश्नांची निवडणूक आयोगाने समर्पक उत्तरे द्यावी, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

कराड : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करताना ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, आ. निलेश लंके, आ. रोहित पवार, माजी खा. श्रीनिवास पाटील, माजी आ. बाळासाहेब पाटील व मान्यवर.

प्रीतिसंगमावर वाहिली श्रद्धांजली :  प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी सोमवारी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासोबत रोहित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आ. रोहित पवार बोलत होते.

उशिरा दिलेला निकालही अन्यायच : ईव्हीएम संदर्भातील न्यायालयीन लढाईबाबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील, असे सांगत आ. पवार म्हणाले, विषय न्यायालयात गेल्यावर त्यांनी योग्य वेळेत निकाल देणे गरजेचे आहे. नाहीतर राष्ट्रवादी कोणाची? याबाबतच्या निकालाला तीन वर्षे कधी निघून गेली, हे कळलेही नाही. उशिरा दिलेले निकालही अन्यायच असतो, असे त्यांनी सांगितले.

अपेक्षा राहिलेल्या नाहीत : राष्ट्रवादी पक्षाच्या न्यायालयीन सुनावणी प्रश्नी ते म्हणाले, उच्च व सर्वोच्च न्यायालयाकडून आता कोणत्याही अपेक्षा राहिलेल्या नाहीत. लोकांवर विश्वास होता. परंतु, महाराष्ट्रात लागलेला निकाल हा लोकांनाही अपेक्षित नसणारा आहे. नेत्यांनी जरी तो स्वीकारला असला, तरी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना तो स्वीकारणे अवघड आहे. सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज चव्हाण, सत्यजितसिंह पाटणकर यांना जवळपास सारखी मते पडले आहेत. पोस्टल मतांचा कौल वेगळा असून ईव्हीएमचा कौल फारच वेगळा आहे. आमच्या बालेकिल्ल्यात मायनस झाल्यावर कुठेतरी पाणी मुरत असल्याचे जाणवायला लागले आहे.

विजयाचे दुसरेच कारण : लाडकी बहीण योजनेचा महायुतीला वाटतो तेवढा फायदा झाला नसावा. असे सांगत आ. पवार म्हणाले, यामागे दुसरे काहीतरी कारण असावे, त्याचा अभ्यास करायला हवा. हाताला काम आणि पोटाला अन्न या व्यतिरिक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रचाराच्या दिशा वळवली गेली. संतांच्या भूमीत भाजपने मोठ्या प्रमाणावर केलेल्या भेदभावालाही काही प्रमाणात यश आले. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या भूमीत दोन्ही उमेदवार पाडण्याचे कारण ईव्हीएम, तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्याची केलेली वातावरण निर्मिती, हेही असावे.

लोकशाही आणि संविधान पायदळी तुडवतील

26 तारखेपर्यंत राज्यात सरकार स्थापन करणे गरजेचे आहे. परंतु, लोकशाही आणि संविधान पाळणारे हे पक्ष नाहीत. ते मनमानी करतील. निवडणूक आयोग त्यांच्या खिशात आहे. न्यायालयाची भूमिकाही काही निर्णयांबाबतीत संशयास्पद असल्याने न्यायालयात जाऊनही काही उपयोग नाही. त्यामुळे लोकशाही आणि संविधान पायदळी तुडवून ते 26 तारीखही ओलांडतील, असे मतही त्यांनी एका प्रश्नावर बोलताना व्यक्त केले.

पुन्हा नव्याने सुरुवात

यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यासमोर व विचारांसमोर आपण नतमस्तक होऊन प्रेरणा घेतली आहे. पुढील पाच वर्ष जनतेच्या विकासासाठी व महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी लोकांमध्ये जाऊन आम्ही सर्वजण लढत राहणार आहोत. त्याला विधानसभा निकालानंतरच सुरुवात केली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

एकहाती सत्ता हे भाजपचे मिशन

पहिले एक वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील. तर नंतरचे चार वर्ष भाजपकडे मुख्यमंत्रीपद राहील, असा अंदाज एका प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना आ. पवार यांनी व्यक्त केला. तसेच 2029 ला एकहाती सत्ता मिळवण्याची भाजपची रणनीती आहे. त्याला यावेळी काही प्रमाणात यश आले आहे. ते आत्ता 144 ला कमी पडले. मनसेने बऱ्याच ठिकाणी एकनाथ शिंदे आणि अजितदादांचे उमेदवार पाडले. यामागे फडणवीस यांचे डोके होते. त्याचबरोबर सध्याचे समीकरण पाहता अजितदादांना दोन वर्षे मुख्यमंत्रीपद मिळेल, असे वाटत नाही. गेल्यावेळी त्यांना मिळालेली मंत्रिपदे यावेळी मिळाली तरी पुष्कळ झाले, असे त्यांनी सांगितले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!