शरद पवार; राज्याचा निकाल अनपेक्षित, ईव्हीएम कडे बोट दाखवणे उचित नाही
कराड/प्रतिनिधी : –
महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली. तसेच जर महायुतीचे सरकार सत्तेतून गेले, तर लाडकी बहिण योजना बंद होईल, अशी भीती निवडणूक प्रचारातून घालण्यात आली. त्यामुळे हे सरकार गेल्यास आपल्याला पुढील हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत, या भीतीने महिलांनी उत्स्फूर्त मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याने महायुतीला मोठे बहुमत मिळाल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी व्यक्त केले.
पत्रकार परिषद : कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील माने, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील उपस्थित होते.
पराभव मान्य : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना श्री. पवार म्हणाले, या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. परंतु, हा जनतेने दिलेल्या कौल आहे, तो मान्य करावाच लागेल. पराभव झाला म्हणून ईव्हीएम व मतदान प्रक्रियेवर शंका उपस्थित करणे योग्य होणार नाही. त्याबाबतची माहिती घेवूनच यावर अधिक बोलणे उचित ठरेल.
अनपेक्षित कौल : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिल्याचे सांगताना श्री. पवार म्हणाले, लोकसभेच्या निकालावरून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमचा विश्वास नक्कीच दुणावला होता. परंतु, जनतेने अनपेक्षितपणे कौल दिला. मात्र, या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीमध्ये समन्वय नव्हता, असे म्हणणे चुकीचे आहे. आपले वय झाल्याने आपण थांबावे, असे बोलले जात आहे. मात्र, मी काय करावे, याबाबत मी आणि माझे सहकारी ठरवतील.
तर…वेगळा मेसेज गेला असता : बारामतीच्या निकालासंदर्भातील प्रश्नावर ते म्हणाले, बारामतीमध्ये मी घरातील उमेदवार दिला नसता, तर सर्वत्र वेगळा मेसेज गेला असता. तसेच अजित पवार यांचा राजकीय अनुभव आणि दुसरीकडे युगेंद्र पवार यांच्यासारख्या नवखा उमेदवारांमध्ये होणाऱ्या लढतीच्या निकालाची आम्हाला कल्पना होती. त्यांच्या दोघांची तुलना होऊ शकत नाही.
पक्षाची मान्यता माझ्याकडे : अजित पवार यांना मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या, हे मान्य करावे लागेल. असे सांगताना श्री. पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? संस्थापक कोण, हे सर्वांना माहिती आहे. राष्ट्रवादी कुणाची? हा निकाल न्यायप्रविष्ठ असला, तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मान्यता आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.
मित्रपक्षांना भाजपचेच ऐकावे लागेल : राज्य सरकारकडून काय अपेक्षा राहतील? या प्रश्नावर बोलताना श्री. पवार म्हणाले, भाजपचे संख्याबळ पाहता त्यांच्याकडेच राज्याचे नेतृत्व राहील. भाजप म्हणेल तेच महायुतीतील मित्रपक्षांना ऐकावे लागेल. विरोधीपक्ष नेतेपद मिळण्याइतपत आपल्या पक्षाचे संख्याबळ नसल्याचे त्यांनी कबूल केले.
मी थांबणारा नव्हे; लढणारा आहे
विधानसभा निवडणुकीमध्ये आमचा मोठा पराभव झाला. मोठया पराभवानंतर एखादा घरात बसला असता. परंतु, मी घरात बसणाऱ्यातील नसून, पुन्हा लोकांच्यात जाणारा, लढणारा आहे. यापुढेही महाराष्ट्राच्या उज्वल भवितव्यासाठी आणि नवीन पिढीच्या सकारात्मक आत्मविश्वासासाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.