माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव; काँग्रेसचा पारंपरिक गड पडला
कराड/प्रतिनिधी : –
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव केला. याठिकाणी भाजपचे डॉ. अतुलबाबा भोसले यांना 1 लाख 39 हजार 505 मते मिळाली. तर विद्यमान आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना 1 लाख 150 मते मिळाली. यामध्ये डॉ. अतुलबाबा भोसले यांचा 39 हजार 355 मतांनी विजयी झाला. कराड दक्षिण हा काँग्रेसचा असलेला पारंपरिक गड नेस्तनाबूत करत भाजपने जोरदार मुसंडी मारल्याने हा निकाल राज्याच्या राजकारणात अधोरेखित झाला आहे.
पहिल्या फेरीपासून लीड : प्रारंभी, सकाळी आठ वाजता कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीस प्रत्यक्ष सुरुवात झाली. यामध्ये पहिल्या फेरीत डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर 1590 मतांचे लीड घेतले. त्यानंतर सहाव्या आणि दहाव्या फेरीत पृथ्वीराज चव्हाण यांनी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यावर घेतलेल्या अल्प मतांचे लीड मोडीत काढत शेवटपर्यंत निर्णायक आघाडी घेतली.
उंडाळे भागातून निराशा : दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत असलेल्या माजी मंत्री स्व. विलासकाका पाटील – उंडाळकर यांचे पुत्र, रयत संघटनेचे नेते अॅड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांच्या बालेकिल्ला असलेल्या उंडाळे भागात डॉ. अतुलबाबा भोसले यांना अनपेक्षित लीड मिळाले. त्यामुळे या ठिकाणाहून पृथ्वीराज चव्हाण यांना मोठी आघाडी मिळण्याची अपेक्षा फोल ठरली. त्यानंतर कराड शहरासह मलकापूर आणि सैदापूरमधील सुज्ञ मतदार पृथ्वीराज चव्हाण यांची पाठराखण करतील, ही अपेक्षाही धुळीस मिळाली. या ठिकाणी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आघाडी घेतली.
बालेकिल्ल्यात मोठे लीड : डॉ. अतुल भोसले यांचा बालेकिल्ला असलेल्या रेठरे बुद्रुकसह कृष्णाकाठच्या गावांनी डॉ. अतुलबाबा भोसले यांना तब्बल 10 हजार मतांची लीड दिले. येथेच डॉ. अतुल भोसले यांचा विजय निश्चित झाला. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजीस सुरुवात केली. त्यानंतर निकालाचे औपचारिकता बाकी राहिल्याने सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी काढता पाय घेतला.
विजयाची घोषणा : निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी डॉ. अतुलबाबा भोसले यांना विजयी उमेदवार घोषित केले. त्यांना 1 लाख 39 हजार 505 मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी पृथ्वीराज चव्हाण यांना 1 लाख 150 मते मिळाली. यामध्ये डॉ. अतुलबाबा भोसले यांचा 39 हजार 355 मतांनी विजयी झाला. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी गुलालाचे उजळणी करत जोरदार घोषणाबाजी केली.
यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन
विजयी उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी समर्थक कार्यकर्त्यांसह विजय रॅली काढली. कार्यकर्त्यांनी गुलालाची उजळण करत फटाक्यांची आत शिवाजी करत मोठा जल्लोष केला. त्यानंतर ही रॅली कराड शहरातील शिवतीर्थ दत्त चौकात आल्यानंतर याठिकाणी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
समर्थक, कार्यकर्त्यांचा जल्लोष
डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार माजी मुख्यमंत्री विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर 15 हजार मतांचे निर्णय लीड घेतल्यानंतर कृष्णा हॉस्पिटल येथे डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांनी गुलालांची उधळण, तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत डॉ. अतुलबाबांच्या विजयार्थ जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर विजयी रॅली काढण्यात आली. यामध्ये डॉल्बी व डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला होता. ही रॅली महामार्गावरून कराड शहरात येताना मोठी वाहतूक कोंडी झाली होती.