कराड उत्तर मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : – 

महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया 23 नोव्हेंबर रोजी होत असून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी कराड उत्तर निवडणूक प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण : मतमोजणीसाठी विविध 214 पथके स्थापन करण्यात आली आहेत. या सर्व पथकांचे मध्यवर्ती अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मतमोजणीचे प्रशिक्षण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, लालासाहेब गावडे, डॉ. जस्मिन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.

साहित्य वाटप : सिलिंग पथक क्रमांक एक व दोन, साहित्य वाटप पथक, सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) इन्चार्ज पथक, एनकोर पथक, संगणकीकरण पथक, पत्रव्यवहार पथक, मतदान यंत्र वाटप पथक, माध्यम पथक, भोजन व्यवस्था व हजेरी पथक, मतमोजणी कामे नियुक्त उमेदवार, प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांना ओळखपत्र वाटप करणारे पथक, कार्यालयातील विद्युत पुरवठा, दूरध्वनी व इंटरनेट सुविधा, जनरेटर अंतर्गत विद्युत पुरवठा, वैद्यकीय सहाय्यता, कार्यालय स्वच्छता, सुरक्षा मानधन वाटप इत्यादी विविध पथकांचे गठन करण्यात आले आहे.

सूक्ष्म नियोजन : प्रशिक्षणात प्रत्येक मध्यवर्ती अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचे स्वरूप निश्चित करून देण्यात आले. त्याप्रमाणे सर्व मध्यवर्ती अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाचे सूक्ष्म नियोजन करून ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात सादर करावे, असे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिले आहेत.

मतमोजणीसाठी 30 टेबल : मतमोजणीसाठी एकूण 30 टेबल ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी पहिल्या 9 टेबलवर टपाली मतमोजणी, नंतरच्या 14 टेबलवर मशिनची मतमोजणी व उर्वरित 7 टेबलवर सैनिकांची मतमोजणी होईल. यासाठी काउंटिंग सुपरवायझर, मायक्रो ऑब्झर्वर, असिस्टंट मायक्रो ऑब्झर्वर, एआरओ अशी नियुक्ती करण्यात आली आहे.

25 ते 26 राउंड : 23 तारखेला सकाळी 6 वाजता स्ट्रॉंगरूम उघडली जाईल. सात वाजेपर्यंत टपाली मतपेट्या टेबलवर आणण्यात येतील. 8 वाजता गोपनीयतेची शपथ घेऊन टपाली मतमोजणीस सुरुवात होईल. त्यानंतर 8 वाजता सर्व 30 टेबलवर मशीन्स आणल्या जातील आणि बरोबर 8.30 वाजता मशीनच्या मतमोजणीस सुरुवात होईल. मशीनमधील मतमोजणीचे 14 टेबलवर 25 ते 26 राउंड होतील आणि त्यानंतर निकाल घोषित केला जाईल. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!