मतदारांमध्ये उत्साह; महिलांच्या मोठ्या रांगा, काटेकोर नियोजन व चोख पोलीस बंदोबस्त
कराड/प्रतिनिधी : –
कराड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या 2024 सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, (दि. 20) रोजी अतिशय चुरशीने मतदान झाले. सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचे कर्तव्य बजावले. सायंकाळी 6 वाजता मतदान प्रक्रिया संपेपर्यंत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण 342 मतदान केंद्रांवर 76.26 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली. तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण 356 मतदान केंद्रांवर 74.73 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ उमेदवार : कराड दक्षिण मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतर्फे कॉँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून इंद्रजित गुजर, वंचित बहुजन आघाडीकडून संजय गाडे, राष्ट्रीय समाज पक्षाकडून महेश जिरंगे, बहुजन समाज पार्टीकडून विद्याधर गायकवाड, तर दोन अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये काँगेसचे विद्यमान आ. पृथ्वीराज चव्हाण व भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यात थेट लढत आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ उमेदवार : कराड उत्तरेत महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील, महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाकडून सोमनाथ चव्हाण, राष्ट्रीय स्वराज सेनेकडून सीमा पोतदार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून सर्जेराव बनसोडे, बहुजन समाज पार्टीकडून श्रीपती कांबळे, वंचित बहुजन आघाडीकडून अंसारअली पटेल यांच्यासह अन्य आठ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आ. बाळासाहेब पाटील व भाजपचे मनोज घोरपडे यांच्यात थेट लढत आहे.
दिवसभरातील मतदानाचा सरासरी टक्का : बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली. सकाळी नऊ वाजेपर्यंत कराड दक्षिण मतदारसंघात 5.63 टक्के मतदान झाले होते. तर उत्तरमध्ये 4.84 टक्के मतदान झाले. सकाळी 10 वाजल्यानंतर मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला. अनेक मतदान केंद्रांबाहेर मंडप उभारण्यात आले होते. त्यानंतर साडेअकरा वाजेपर्यंत दक्षिणमध्ये 19.71 टक्के, तर उत्तरमध्ये 18.57 टक्के मतदान झाले. दुपारी एक वाजता दक्षिणमध्ये 36.58, तर उत्तरमध्ये 35.47 टक्के मतदान झाले. दुपारी 3 वाजता कराड दक्षिणमध्ये 52.56, तर उत्तरमध्ये 52.03 टक्के मतदान झाले.
त्यानंतर सायंकाळी उन्हाचा पारा कमी झाल्यामुळे मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. सायंकाळी पाच वाजता कराड दक्षिणमध्ये 67.91 टक्के, तर
उत्तर 67.23 टक्के मतदान झाले. सायंकाळी सहा वाजता मतदान प्रक्रिया संपेपर्यंत कराड दक्षिणमध्ये एकूण 76.26, तर उत्तरेत एकूण 74.73 टक्के मतदान इतके मतदान झाले.
मतदान केंद्रांवर कॅमेऱ्याचा वॉच : कराड दक्षिण व उत्तर मतदारसंघासाठी झोनल ऑफीसर, फिरती पथके व स्थिर पथके कराड शहर, तसेच तालुक्यातील मतदान केंद्रावरील घडामोडी व हालचालींवर लक्ष ठेउन होती. ईव्हीएम मशिन बिघडण्याचा प्रकार तालुक्यात कोणत्याही ठिकाणी घडला नाही. प्रत्येक मतदान केंद्रांवर कॅमेऱ्याचा वॉच ठेवण्यात आला होता.
काही ठिकाणी गैरसोय :निवडणूक आयोगाने मतदानाच्या आदल्या दिवशीच मतदारांपर्यंत व्होटर स्लीप्स पोहचवल्या होत्या. तरीही अनेक मतदारांपर्यंत व्होटर स्लीप्स पोहचल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांना मतदारयादीत आपले नाव शोधण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत होते. त्यांना मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींची मदत घ्यावी लागत होती.
विद्यार्थी स्वयंसेवक :निवडणूक आयोगाने महिला मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पिंक बूथ केंद्राचा उपक्रम राबवला होता. शाळकरी विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करताना मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचवत होती. मतदान केंद्रात पाळावयाच्या सुचनांबाबतही ते मतदारांना मार्गदर्शन करीत होते.
चोख पोलीस बंदोबस्त : कराड शहरात ठिकठिकाणी केंद्राबाहेरील शंभर मीटर सुरक्षित अंतराच्या नियमांचे उल्लंघन केले जात होते. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर रात्री उशिरापर्यंत कराडमधील स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम मशिन आणण्याचे काम कडक बंदोबस्तात सुरु होते. दरम्यान, दोन्ही मतदारसंघात संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान सर्वच मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
निकालाची उत्सुकता :मतदान प्रक्रिया संपल्यावर सर्वच उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. आता कार्यकर्त्यांसह सामान्य मतदारांनाही शनिवारी जाहीर होणाऱ्या निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.
विरवडेतील बूथवर तणाव
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विरवडे गावात आत्माराम विद्यामंदिर येथील बूथवर निवडणूक केंद्र अधिकाऱ्याच्या विरोधात काही ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे त्याची तात्काळ दुसऱ्या निवडणूक केंद्रावर बदली करण्यात आली. त्यामुळे तेथे काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.