डॉ. अतुलबाबा भोसले; कार्वे येथे प्रचार सभा
कराड/प्रतिनिधी : –
कार्वे गावाच्या विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. गेल्या अडीच वर्षांत कार्वे गावात महायुती सरकारच्या माध्यमातून पावणे एकोणतीस कोटींचा विकासनिधी आला असून, यातील बहुतांश कामे मार्गी लागली आहेत. येत्या काळात श्री धानाई देवस्थानचा विकास आराखडा तयार करुन, याठिकाणी भव्य भक्त निवास साकारण्याचा, तसेच अध्यात्मिक पर्यटन वाढीला चालना देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.
प्रचार सभा : कार्वे (ता. कराड) येथे महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, माजी आ. आनंदराव पाटील, कृष्णा कारखान्याचे व्हा. चेअरमन जगदीश जगताप, संचालक निवासराव थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उमेदीच्या दिवसात विकास केला नाही : राज्यात विविध भागांमध्ये मोठ्या फाईव्ह स्टार एम.आय.डी.सी. आहेत. मात्र, कराडची एम.आय.डी.सी. विकासित होऊ शकली नाही, असे खंत व्यक्त करत डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, येथील मुलांच्या हाताला काम नाही. 50 वर्षे सत्तापद घेऊनही विद्यमान लोकप्रतिनिधींनी उमेदीच्या दिवसात शाश्वत विकास व रोजगार निर्मिती केली नाही. ते येत्या काळात काय करणार?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच कराड दक्षिणच्या शाश्वत विकासासाठी मला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.
मान्यवरांची भाषणे : यावेळी मदनराव मोहिते, आनंदराव पाटील यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाला मानसिंग पाटील, आप्पासाहेब गायकवाड, सर्जेराव कुंभार, संपतराव थोरात, दिग्वीजय थोरात, शिवाजीराव थोरात, प्रकाश वायदंडे यांच्यासह कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेवेदावे बाजूला ठेवा
विद्यमान लोकप्रतिनिधींना येथील जनतेने अनेकदा संधी दिली. परंतु, निवडून आल्यानंतर दिल्ली, मुंबईला गेल्यावर त्यांनी मतदारसंघाकडे पाहिलेही नाही. त्यामुळे आता विकासासाठी तत्पर असलेल्या अतुलबाबांना जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे. त्यासाठी प्रत्येकाने आपापसातील हेवेदावे बाजूला ठेऊन अतुलबाबांना विजयी करावे, असे आवाहन जगदीश जगताप यांनी केले.
