डॉ. अतुलबाबा भोसले; एमआयडीसीच्या माध्यमातून मोठे उद्योग, प्रकल्प आणणार
कराड/प्रतिनिधी : –
केंद्रात मंत्री, राज्यात मुख्यमंत्री, खासदार, आमदार अशी पदे भूषवणाऱ्या विद्यमान आमदारांनी मतदारसंघासाठी काय केले? सत्तापदावर असताना त्यांनी मतदारसंघाकडे कधी ढुंकुनही पाहिले नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर ते आयटी हब, रोजगार यांसारखी खोटी आश्वासने देत आहेत. निवडणुकीनंतर ही सर्व आश्वासने हवेत विरतील. त्यामुळे दहा वर्षांत शाश्वत विकास न करणाऱ्या लोकप्रतिनिधीला जनतेनेच जाब विचारत आपल्या मतातून आता दक्षिणेत परिवर्तन करायला हवे, असे आवाहन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.
येळगाव येथे जाहीर सभा : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप – महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ येळगाव (ता. कराड) येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, पै. आनंदराव मोहिते, भूषण जगताप, संजय शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भागात मोठा विकासनिधी आणला : येळगाव भागात गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारच्या माध्यमातून मोठा विकासनिधी आणल्याचे सांगत डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या लाडकी बहीण, बांधकाम कामगार, आयुष्यमान भारत, वयोश्री, नमो शेतकरी यांसारख्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांना मिळण्यासाठी मी विशेष प्रयत्न केले.
युवकांसाठी रोजगार निर्मिती : शिरवळ येथे कृष्णा हॉस्पिटलची दुसरी शाखा सुरु होत असल्याचे सांगत डॉ. अतुलबाबा म्हणाले, या माध्यमातून युवकांच्या हाताला मोठा रोजगार मिळणार आहे. तसेच कराडच्या एमआयडीसीला फाईव्ह स्टार दर्जा देण्याची मागणी आपण केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे. त्या माध्यमातूनही कराडला मोठे उद्योग, प्रकल्प येणार असून मोठी रोजगार निर्मिती करण्याचे माझे ध्येय आहे. यासाठी मतदारांनी माझे हात बळकट करून मोठे मताधिक्य देत सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.
विलासकाकांचे कार्यकर्ते विद्यमान लोकप्रतिनिधींना धडा शिकवतील : माजी आ. विलासराव पाटील – उंडाळकर यांना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या काही वर्षांत प्रचंड मानसिक त्रास दिला, त्यांचे तिकीट कापले. तेच आता काकांच्या नावाने मते मागताहेत. परंतु, काकांचे स्वाभिमानी कार्यकर्ते असल्या खोटारडेपणाला न भुलता त्यांना चांगलाच धडा शिकवतील, असा विश्वास पै. आनंदराव मोहिते यांनी व्यक्त केला.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेने डॉ. अतुलबाबांना जाहीर पाठिंबा दिला. याप्रसंगी मदनराव मोहिते, सुनील पाटील, प्रमोद मोहिते, अण्णासाहेब जाधव, राजू पाटील, गणेश शेवाळे, राजू मुल्ला, विवेक पाटील यांच्यासह कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भोसले कुटुंबीयांचे मोठे योगदान
डॉ. अतुलबाबांच्या रुपाने भोसले कुटुंबाची तिसरी पिढी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. कृष्णा हॉस्पिटल, कृष्णा विद्यापीठाच्या माध्यमातून भोसले कुटुंबीयांनी आरोग्य व शिक्षणक्षेत्रात मोठे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची परतफेड म्हणून जनतेने अतुलबाबांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवावे, असे आवाहन पै. आनंदराव मोहिते यांनी केले.