महाराष्ट्रावरील गद्दारीचा डाग ही अमित शहांची देण 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात; समोरासमोर या, आम्ही काय केले ते सांगतो 

कराड/प्रतिनिधी : –

महाराष्ट्राची गद्दारांचे राष्ट्र अशी झालेली ओळख ही अमित शहांची देण आहे, असा घणाघात पंतप्रधान कार्यालयाचे माजी मंत्री तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केला.

टीकेला टीकेने प्रत्युत्तर : विंग (ता. कराड) येथील एका सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस, तसेच शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. त्यावर प्रसारमाध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या उत्तरादाखल पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.

मग विकासाच्या बाता मारा : एकेकाळी महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगत श्री. चव्हाण म्हणाले, महाराष्ट्र दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत सध्या 11 व्या क्रमांकावर आहे. याला दहा वर्षांतील महायुती सरकारची सुमार कामगिरीच जबाबदार आहे. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, दिल्ली, गोवा ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे आहेत. हे चुकीचे असल्यास त्यांनी सांगावे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात ते कबूल केले आहे. त्याचा व्हिडिओ शहांनी पहावा आणि मग विकासाच्या बाता माराव्यात. 

सगळे उद्योग गुजरातला पळवले : महाराष्ट्रात सध्या सुशिक्षित, बेरोजगारांची फौज निर्माण झाली असल्याचे सांगत श्री. चव्हाण म्हणाले, शहा आणि त्यांच्या नेत्यांनी सगळे उद्योग गुजरातला पळवले आणि तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस तोंडाला पट्टी बांधून गप्प राहिले. मुंबई – अहमदाबाद ही सव्वालाख कोटींची बुलेट ट्रेन केली. याची कोणी मागणी केली होती. केवळ गुजरातला महाराष्ट्राच्या डोक्यावर बसवण्यासाठी हा उद्योग त्यांनी केला. यासाठी कराड – चिपळूण हा मंजूर झालेला रेल्वे प्रकल्प रद्द करून त्याचा निधी बुलेट ट्रेनकडे वळवण्यात आला. तसेच अमित शहा यांनी उपस्थित केलेल्या 370 कलम, वक्फ बोर्ड, जम्मू-काश्मीरचा प्रश्न या मुद्द्यांचाही त्यांनी समाचार घेतला. 

अमित शहा यांना दिले खुले आव्हान : काँग्रेसने सत्ताकाळात काय केले? असे अमित शहा यांच्यासारख्या एका जबाबदार व्यक्तींनी केलेले वक्तव्य हास्यास्पद असल्याचे सांगत श्री. चव्हाण म्हणाले, यावर खरंच बोलायचे असेल, तर मी मनमोहन सिंग सरकारने काय केले, ते सांगतो. त्यासाठी समोरासमोर या!, असे खुले आव्हानही पृथ्वीराज चव्हाण यांनी अमित शहा यांना दिले. 

विकासकामे हवेतून पडली का? 

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात तब्बल 700 कोटींचे भूकंप संशोधन केंद्र मी आणले. तसेच स्वतंत्र आरटीओ कार्यालय, प्रशासकीय इमारत, कराडचे बस स्थानक आदी कामे हवेतून पडली? की ती अमित शहांनी आणली? असा टोलाही आ. चव्हाण यांनी यावेळी अमित शहा यांना लगावला. 

झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव नागरिकांनी स्वीकारला नाही 

मी मुख्यमंत्री असताना कराडमधील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव नागरिकांसमोर मांडला होता, असे सांगताना श्री. चव्हाण म्हणाले, मी मांडलेला प्रस्ताव नागरिकांनी स्वीकारला नाही. कराडला नगराध्यक्षा भाजपच्या होत्या. महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचा होता. केंद्रात पंतप्रधानही भाजपचेच होते. असे असताना तुम्ही का निर्णय घेतला नाही? असा प्रतिसवालही आ. चव्हाण यांनी अमित शहा यांना केला.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!