उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

अमित शहा; राहुल गांधी, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर डागले टीकास्त्र 

कराड/प्रतिनिधी : –

2019 च्या निवडणुकीत हिंदुत्वाच्या झेंड्याखाली भाजप – शिवसेनेने निवडणूक लढवली. परंतु, 370 कलम आणि राम मंदिराला विरोध करणाऱ्यांसोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी विश्वासात केला. हिंदुत्वाला ठोकर मारत हिंदुत्वालाच आतंकवादी म्हणणाऱ्या माणसांसोबत जाताना त्यांना लाज वाटली नाही, अशी जहरी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. तसेच यावेळेला आम्ही ती चूक करणार नाही. महाराष्ट्रात महायुतीलाच बहुमत मिळेल, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी यांनी व्यक्त केला. 

विंग : डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेला झालेली अलोट गर्दी. 

डॉ. अतुल भोसले यांच्यासाठी प्रचारसभा : विंग (ता. कराड) येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी खा. उदयनराजे भोसले, उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी आ. आनंदराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

राहुल गांधींचा घेतला समाचार : अग्निवीरांबाबत चुकीचे बोलणाऱ्या राहुल गांधींच्या भूल थापांना युवकांनी बळी पडू नये, असे आवाहन करत ना. शहा म्हणाले, त्यांच्याप्रमाणे खोटे वायदे न करतात आम्ही महाराष्ट्रातील सर्व अग्निवीरांना केंद्र व राज्य सरकारची पेन्शन मिळेल अशी नोकरी देणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. सातारा ही वीरांची भूमी असून येथील वीरांना आणि वीरमातांना मी प्रणाम करतो. मोदींनी ‘वन रँक वन पेन्शन’च्या माध्यमातून एक लाख 55 हजार कोटी रूपये जवानांच्या खात्यावर जमा केल्याची त्यांनी सांगितले.

विंग : विरोधकांवर टीकास्त्र डागताना केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा. 

केंद्रात मंत्रिपदे भुषवणाऱ्यांनी काय केले? : शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा समाचार घेताना ना. शहा म्हणाले, 50 वर्षे सत्तेत असताना, तसेच केंद्रात दहा वर्षे मंत्रिपदे भुषवणाऱ्या शरद पवार आणि प्रधानमंत्री कार्यालयात मंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रासाठी काय केले. काँग्रेसचे केंद्रीय अध्यक्ष खरगे हे त्यांच्या नेत्यांना लोकांना शब्द देताना तो पूर्ण करता आला पाहिजे हे समजून द्या, असे स्पष्टपणे सांगतात. मग असा पक्ष महाराष्ट्राचा विकास काय करणार, असा टोलाही त्यांनी यावेळी लागला.

शरद पवारांना विकासकामे दाखवण्याचे आव्हान : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 कोटी गरिबांना पक्के घर देण्याचे काम केले. तसेच समृद्धी महामार्ग, मुंबई – पुणे कॉरिडॉर, अटल सेतू, मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो, कृष्णा, नीरा नदी योजना आदी अनेक विकासकामे केल्याचे सांगत ना. शहा म्हणाले, शरद पवारांनी आघाडीच्या माध्यमातून एक काम केल्याचे त्यांनी सांगावे. आम्ही केलेली कामे मी पुराव्यानिशी दाखवतो, असे खुले आव्हानही त्यांनी शरद पवार यांना दिले. तसेच यूपीए सरकारच्या काळात दहा वर्षांमध्ये शरद पवारांनी महाराष्ट्राला केवळ एक लाख 91 हजार कोटी रूपये दिले. मात्र, मोदींनी दहा वर्षांत 10 लाख 15 हजार 890 कोटी रुपये दिल्याचेही त्यांनी सांगितले.

मोदींची गॅरंटी

पी. एम. किसान योजनेचा हप्ता 15 हजारांवर नेणार, आयुष्मान भारत योजनेमार्फत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार, 70 वर्षांवरील नागरिकांना आणखी पाच लाख रुपये, तसेच प्रधानमंत्री योजनेतून पाच लाख रुपये असे 15 लाख रुपयांचे मोफत उपचार मिळणार, दोन लाख नागरिकांना हर घर जल, सातारा जिल्ह्यात उज्वला योजनेतून एक लाख 65 हजार गॅस कनेक्शन वितरण, कराड विमानतळासाठी 221 कोटी निधी मंजूर, नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी निधी, वयोवृद्ध योजनेतून पेन्शन, लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रतिमहा, 10 लाख युवकांना नोकरी, अंगणवाडी, आशा सेविकांना 15 हजार रुपये मानधन, ही मोदींची गॅरंटी असल्याचे ना. शहा यांनी सांगितले. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!