कळ्याच्या खळ्यावर शाईनचा थाट

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

दुचाकीच्या साह्याने भात मळणी; शेतमजुरी वाचवण्यासाठी अनोखी शक्कल

कराड/प्रतिनिधी : –

हल्ली पारंपारिक शेती पद्धतीला फाटा देत युवक, शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत आहेत. यासाठी ट्रॅक्टरसह अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर केला जातो. यामुळे शेतमजुरी वाचण्यास मदत होते. परंतु, कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण शेतकरी मधुकर पाटील यांनी खळ्यावर भात मळणीसाठी दुचाकीचा वापर करून शेतमजुरांचा तुटवडा, तसेच शेतमजुरी वाचण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांच्या या युक्तीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून कळ्याच्या खळ्यावरील शाईनचा थाट पाण्यासाठी प्रवासी गर्दी करत होते.

पारंपरिक शेती पद्धतीला फाटा : कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यातील ग्रामीण भाग तसा सुपीक व डोंगराळ आहे. येथील डोंगराळ भागात आजही पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. येथील काही ठिकाणी भात मळणीसाठी शेतात खळे तयार करून बैलांच्या साह्याने भात मळणी केली जाते. तसेच खळ्यावर खाट ठेवून त्यावर मजुरांच्या साह्याने भात चोपले जाते. या दोन पद्धती प्रामुख्याने सर्वत्र वापरल्या जातात. त्यात हल्ली आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टर मळणी मशीनच्या साह्यानेही भात काढणी व मळणीला शेतकऱ्यांकडून पसंती दिली जात असल्याचे दिसून येते.

शेतकरी मधुकर पाटील यांची शक्कल : सुगीच्या दिवसात शेतमजूर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने, तसेच अव्वाच्या सव्वा वाढलेली शेतमजुरी आणि डिझेलचे वाढते दर यांमुळे शेतमजूर आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने भात मळणी करणे शेतकऱ्यांना सध्या परवडेनासे झाले आहे. यावर कोल्हापूर जिल्ह्यातील हरहुन्नरी युवक शेतकरी मधुकर पाटील यांनी लढवलेली शक्कल लक्षवेधी व फायदेशीर ठरली आहे.

दुचाकीच्या साह्याने भात मळणी :

गगनबावडा – कळे रस्त्यालगत शेतकरी भाऊ दत्तू माने रा. पळसंबे (कळे) ता. गगनबावडा यांची भातशेती आहे. रविवारी भाऊबीज दिवशी श्री. माने यांच्या शेतात भात कापणी व मळणी सुरू होती. मात्र, भात मळणीसाठी दुचाकीचा वापर करण्यात आल्याने ही अनोखी शक्कल अनेकांसाठी लक्षवेधी ठरली. यामुळे कुतूहलापोटी रस्त्यावरून ये – जा करणारे अनेक प्रवासी क्षणभर थांबून या अनोख्या भात मळणीची पाहणी व संबंधित शेतकऱ्यांची विचारपूस करत होते. त्याचबरोबर या शेतकऱ्यांनी वापरलेल्या अनोख्या कल्पकतेचेही अनेकांनी कौतुक केले.

बहुतांश शेतकऱ्यांकडे बैलजोड्या उपलब्ध नाहीत. तसेच मशीनच्या सहाय्याने भात मळणीसाठी एका पोत्याला 100 रुपये घेतले जातात. म्हणजे दहा पोत्यांचे 1000 रुपये होतात. तर यासाठी दुचाकीला फक्त दोन लिटर पेट्रोल (200 रूपये) लागते. म्हणजेच तब्बल 800 रुपयांचे बचत होते.

– भाऊ माने (शेतकरी)

दुचाकीच्या साह्याने भात मळणी अत्यंत साधी-सोपी आणि कमी खर्चिक आहे. आम्ही दोन-चार वर्षांपासून ही पद्धत वापरतोय. यामुळे वेळेची व पैशाची बचत होते.

– मधुकर पाटील (शेतकरी) 

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!