पृथ्वीराज चव्हाण यांनी
साधेपणाने भरला उमेदवारी अर्ज
कराड/प्रतिनिधी : –
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज साधेपणाने दाखल केला. प्रारंभी, त्यांनी प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी, तसेच शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
साधेपणाने दाखल केला उमेदवारी अर्ज :
सध्या बाजारपेठेत मंदीचे वातावरण असून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक, व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी आपण कोणत्याही प्रकारे शक्तिप्रदर्शन न करता अगदी साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती :
यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील-उंडाळकर, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष इंद्रजीत मोहिते, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजितराव पाटील-चिखलीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्या विद्याताई थोरवडे, मलकापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा निलमताई येडगे, मराठा महासंघ सातारा जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली जाधव, ओबीसी संघटना राज्य अध्यक्ष भानुदास माळी, राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा गितांजली थोरात, सातारा जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष प्रा. धनाजी काटकर, कराड दक्षिण काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, माजी सभापती रमेश देशमुख आदींची उपस्थिती होती.
कराडकर आपल्याला आशीर्वाद देतील : ही विधानसभा निवडणूक राज्याच्या दृष्टीने महत्त्वाची असून परिवर्तन अटळ आहे. यामध्ये आपला सहभाग असण्यासाठी या निवडणुकीत कराडकर आपल्याला आशीर्वाद देतील, असा विश्वास आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
लाडक्या बहिणींचाच अपमान : महायुती सरकारचा समाचार घेताना ते आ. चव्हाण म्हणाले, एकीकडे राज्य सरकार लाडक्या बहिणींना 1500 रुपये देते. तर दुसरीकडे नगर जिल्ह्यात महिलांचा अपमान केल्याची निंदनीय घटना घडली आहे. हा लाडक्या बहिणींचा अपमान नाही का? असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. याबाबत भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी अद्याप माफी मागितलेली नाही. त्यांना असल्या कृत्यांबाबत जनताच धडा शिकवेल.
दक्षिणेत जातीवादी प्रवृत्तीचा प्रवेश होऊ द्यायचा नाही : कराड दक्षिणमधील उमेदवारीबाबत बोलताना ते म्हणाले, कराड दक्षिणसाठी आतापर्यंत एकूण दहा अर्ज दाखल झाले असले, तरी या ठिकाणी प्रामुख्याने दोन विचारांची लढाई आहे. पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कराडमध्ये जातीवादी प्रवृत्तीचा प्रवेश होऊ द्यायचा नाही, यासाठीचे प्रयत्न आहेत. येथील जनता सुज्ञ असून ती महाविकास आघाडीला बहुमत देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गद्दारीचा डाग पुसायचा आहे : अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात घडलेल्या गद्दारीबाबत बोलताना आ. चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राला मोठी सांस्कृतिक, राजकीय, ऐतिहासिक परंपरा आहे. परंतु, काहींनी अभद्र युती केल्यामुळे या संस्कृतीला डाग लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आणि समविचारी राजकीय पक्ष एकत्र मिळून हा डाग पुसून टाकण्याचा प्रयत्न करतील. यात जनताच यश देईल.
कराड दक्षिणसाठी 10 अर्ज दाखल : दरम्यान, यापूर्वी गुरुवार, दि. 24 रोजी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते इंद्रजित गुजर यांच्यासह अन्य आठ जणांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
कडेकोट पोलीस बंदोबस्त
कराड शहरातील तहसील कार्यालयात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी, तर यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दोन्ही मतदारसंघासाठी दिग्गज नेते सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्रित आले होते. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.