आ. पृथ्वीराज चव्हाण; बेलवडे येथे कार्यकर्त्यांशी संवाद
कराड/प्रतिनिधी : –
राज्याचा मुख्यमंत्री असताना कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे आणली. त्यामुळे मला कराड दक्षिणच्या जनतेने भरभरून आशिर्वाद दिला. त्यानंतर राज्यात 10 वर्षे भाजपचे सरकार सत्तेत असून विरोधी लोकप्रतिनिधींना विकासकामे देताना त्यांनी आडकाठी आणली. परंतु, तरीही मी विकासकामे खेचून आणत मतदारसंघातील कामे पूर्ण केली. केवळ निवडणुकीत दाखविण्यासाठी बॅंनरबाजी किंवा नारळ फोडले नाहीत, असा टोला माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.
बेलवडेत कार्यकर्त्यांशी साधला संवाद :कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील बेलवडे (ता. कराड) येथे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती :
यावेळी ज्येष्ठ नेते अजितराव पाटील-चिखलीकर, कराड दक्षिण सेवादलाचे अध्यक्ष शिवाजीराव थोरात, पै. नानासो पाटील, नितीन थोरात, लोकनेते विलासकाका पाटील रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक जयवंतराव मोहिते (भाऊ), जखिणवाडीचे माजी सरपंच नरेंद्र पाटील, बेलवडे बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य मारुती मोहिते (आबा) व जयवंतराव मोहिते (दादा) धनाजीराव थोरात, इंजिनीयर भगवान मोहिते, शहाजी मोहिते, माणिकराव मोहिते, अर्जुनराव मोहिते, भास्करराव मोहिते, युवक काॅंग्रेसचे देवदास माने (मालखेड), ज्येष्ठ नागरिक ज्ञानदेव माने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दक्षिणची जनता काँग्रेसच्याच पाठीशी :माझ्या राजकीय कारकिर्दीत कोट्यावधींची विकासकामे करता आल्याचे सांगत आ. चव्हाण म्हणाले, कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात तब्बल 1800 कोटींची विकासकामे केली. राज्यघटनेने लोकप्रतिनिधींना विकासकामे सुचविण्याचा अधिकार दिला आहे. विकासकामांच्या जीवावरच मला लोकांनी दोनवेळा खराब लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत आणि दोनवेळा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत पाठवले. आता कराड दक्षिणची जनता कोणत्याही भूलथापांना बळी न पडता पुन्हा काँग्रेसच्याच पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
बेलवडेतून पृथ्वीराजबाबांना मताधिक्य देऊ : आमच्या गावात 2018 साली मोठ्या शब्दात विरोधकांनी विकासकामांचे बोर्ड लावले. मात्र, आजही ते काम झालेले नाही. असे सांगत शिवाजीराव मोहिते म्हणाले, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि लोकनेते विलासकाका पाटील रयत सहकारी साखर कारखाना आणि कोयना सहकारी बँकेचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बेलवडे बुद्रुक गावातून काॅंग्रेसला मोठे मताधिक्य देवू, असे ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कार्यकर्ते पृथ्वीराजबाबांसोबतच : आ. पृथ्वीराजबाबांच्या माध्यमातून वाडी- वस्तीवर 100 टक्के रस्ते पूर्ण झाले असल्याचे सांगत भगवानराव मोहिते म्हणाले, सध्या निवडणुकीचा हंगाम असल्याने काहीजण इकडे-तिकडे करत असतील. परंतु, नेते कुठेही जावू द्या, कार्यकर्ते मात्र पृथ्वीराजबाबांसोबतच आहेत. आमच्या नेत्यांनी लावलेले बोर्ड हे पूर्ण झालेल्या विकासकामांचे, तसेच वर्कआॅर्डर घेतलेले आहेत. तर विरोधकांचे बोर्ड हे निवडणुकीत आश्वासन देण्यापुरतेच मर्यादित असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
पक्षप्रवेश आणि पाठिंबा
भाजपच्या भारतीय किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि गेली अनेक वर्ष डाॅ. अतुल भोसले यांच्यासोबत असलेले बेलवडे बुद्रुक येथील प्रदीप मोहिते यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. तसेच याप्रसंगी दिलीप सकटे यांनीही आ. पृथ्वीराज चव्हाण यांना आपला पाठिंबा दिला.