कराड/प्रतिनिधी : –
सरकारच्या माध्यमातून होणाऱ्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कराड दक्षिणच्या विद्यमान लोकप्रतिनिधीकडून सुरु असून त्यांच्या निष्क्रीयतेमुळे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विकास गेल्या दहा वर्षांपासून रखडला असल्याची टीका शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाव न घेता केली.
मलकापूर (ता. कराड) येथे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते. यावेळी मलकापूरचे माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव, माजी नगरसेवक अजित थोरात, दिनेश रैनाक, राजू मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.
येत्या निवडणुकीत लोकं धडा शिकवतील : निष्क्रिय लोकप्रतिनिधींनी लोकांच्या उपयोगी पडेल, असे एकही काम आत्तापर्यंत केलेले नसल्याचे सांगत श्री. थोरात म्हणाले, येत्या निवडणुकीत लोकं त्यांना याचा धडा नक्की शिकवतील. भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबांकडे सामाजिक कार्याचा वारसा आहे. आप्पासाहेब, डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतुल भोसले यांनी विकासाच्या बाबतीत कधीही हयगय केलेली नाही. हजारो माणसांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.
सत्ताधाऱ्यांनी हुकूमशाही निर्माण केली : श्री. थोरात यांनी मलकापुरात सत्तेवर असणाऱ्यांनी गेल्या 20 वर्षांत हुकुमशाही निर्माण केली असल्याची टीका माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यावर नाव न घेता केली. तसेच मलकापूरातील जनता यावेळी डॉ. अतुल भोसले यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहून त्यांना आमदार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
मलकापुरात नागरी सुविधांचा अभाव : मलकापुरात वाढत्या लोकवस्तीच्या प्रमाणात येथे नागरी सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगत डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही काही दिवसांपूर्वी 20 कोटी 80 लाखांचा निधी मंजूर करुन आणला. कराड दक्षिणेत सरकारच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त झाला असून, बरीचशी विकासकामे पूर्णत्वास गेली आहेत. येत्या काळात मलकापुरसह कराड दक्षिणच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटीबद्ध आहे.
यावेळी शहाजी पाटील, सुहास कदम, सुहास जाधव, भीमराव माहूर, अमित थोरात, पी. पी. पाटील, कराडचे माजी विरोधी पक्षनेते महादेव पवार, हेमंत पाटील यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.