वंचितच्या संजय गाडे यांचा आरोप; कराड दक्षिणमधून निवडणूक लढवण्याची घोषणा
कराड/प्रतिनिधी : –
राज्यात सध्या तब्बल 65 हजार मराठी शाळा बंद झाल्या आहेत. यामागे शिक्षणावर घाला घालून सर्वसामान्यांच्या मुलांचे शिक्षण बंद पाडण्याचा डाव आहे. महायुतीच्या या निर्णयाला महाविकास आघाडीचाही अंतर्गत पाठिंबा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून एक सपनाथ, तर दुसरी नागनाथ असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय गाडे यांनी केला.
कराड दक्षिणमधून उमेदवारीची घोषणा : कराड येथे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई व महासचिव शरद गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संविधान बळकट करण्यासाठी निवडणूक रिंगणात :वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांचा आदेशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बळकट करण्यासाठी कराड दक्षिणमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगत संजय गाडे म्हणाले, कराड दक्षिण मतदारसंघ 10-15 वर्षांपूर्वीच आरक्षित व्हायला पाहिजे होता. येथील एससी, एसटी, ओबीसी असे म्हणून सुमारे 58 ते 60 टक्के मतदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह आरपीआयचे दोन्ही गट व ओबीसी बांधवांनी धनदांडगे विरुद्ध श्रमजीवी अशा होणाऱ्या या लढतीत, आपणास मतदान करून विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दोन्ही बाबांना पाडण्याचा विडा
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस तर्फे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा), तर भाजपतर्फे डॉ. अतुल भोसले (बाबा) हे दोन्ही दिग्गज नेते निवडणूक रिंगणात आहेत. परंतु, वंचितांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत असून या दोन्ही बाबांना पाडण्याचा विडा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण उचला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
भाजप निकम्मी… काँग्रेस मम्मी
आज महायुती आणि महाविकास आघाडीने सर्वसामान्यांच्या मुलांच्या शिक्षणावर घाला घातला आहे. उद्या संविधानावर घाला घालून ते मोडीत काढले जाणार आहे. हे दोन्ही एकमेकांना सामील आहेत. यामुळे ‘भाजप निकम्मी आणि काँग्रेस मम्मी’ अशीच सध्याची परिस्थिती असून हे दोघेही संविधानाचे 12 वाजवणार आहेत. त्यामुळेच संविधान वाचवण्यासाठी राज्यात वंचित बहुजन आघाडीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.