स्व. जयवंतराव भोसले व रविंद्र बोडकीहाळ यांना यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार
कराड/प्रतिनिधी : –
येथील श्री कालिकादेवी नागरी सह. पतसंस्थेच्यावतीने सामजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सहकार, वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या व्यक्तींना ‘यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात येते.
या मान्यवरांच्या कार्याची दखल : त्यानुसार सन 2021-22 चा हा पुरस्कार कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांना मरणोत्तर प्रदान करून त्यांच्या सामाजाभिमूख कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच सन 2022-23 चा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बोडककीहाळ (फलटण) यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पुरस्कार समितीचे निमंत्रक प्रा. अशोककुमार चव्हाण, श्री कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान (सावकार) व चेअरमन राजन वेळापुरे यांनी दिली. यावेळी ज्येष्ठ संचालक अरुण जाधव, डॉ. संतोष मोहिरे व कार्यलक्षी संचालक विवेक वेळापुरे उपस्थित होते.
या मान्यवरांचा झाला होता सन्मान : एक लाख, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून जेष्ठ पत्रकार अनंत दीक्षीत, कविश्रेष्ठ ना. धो. महानोर, प्रा. डॉ. सदानंद मोरे, सिने कलाकार नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फौडेंशन, शांतीलाल मुथा, इंद्रजित देशमुख (काकाजी), सिक्कीमचे माजी राज्यपाल माजी खासदार श्रीनिवास पाटील, स्व. पी. डी. पाटीलसाहेब (मरणोत्तर), पद्मभुषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (मरणोत्तर) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कृष्णा अभिमत विद्यापीठचा पाया :
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कल्पनेतील आधुनिक महाराष्ट्र साकारण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींमत्वामध्ये स्व. जयंतराव भोसले (आप्पासाहेब) यांचे स्थान अग्रस्थानी आहे. कृष्णा सहकारी साखर कारखाना, कृष्णा सहकारी बँक, कृष्णा उद्योग समूह, कृष्णा हॉस्पिटल, कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या उभारणीसह कृष्णा अभिमत विद्यापीठचा पाया त्यांनी घातला. प्राथमिक शिक्षणापासून कला, वाणिज्य, विज्ञान सह वैद्यकीय उच्चशिक्षण या सोई त्यांनी परिसरातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या. हजारो युवकांना रोजगार देतानाच अनेक उद्योजकांच्या पाठीशी ते खंबीर पणे उभे राहिले. मा. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराची पाठराखण करणाऱ्या स्व. जयवंतरावजी भोसले यांचा हा मरणोत्तर सन्मान त्यांचे सुपुत्र कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन अँड मॅनेजिंग ट्रस्ट्री डॉ. सुरेश भोसले स्वीकारणार आहेत.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक :
सन 2022-23 चा पुरस्कार ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती चिरंतन जपणारे व स्व. यशवंत विचारांचा महाराष्ट्रभर जागर करणारे जेष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ (फलटण) यांना याच संयुक्त समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष, ‘दर्पण’ पुरस्काराचे प्रणेते, अधिस्विकृती धारक पत्रकारांच्या मानधनांमध्ये वाढ होणे, यासाठी पाठपुरावा करणारे व्यक्तिमत्व, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळावर सदस्य, यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाचे जनक अशी यांची ओळख आहे.
सौ. वेणुताई चव्हाण सभागृहात वितरण सोहळा : 15 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता सौ. वेणुताई चव्हाण सभागृह कराड येथे सदर सोहळा आयोजित केला असून समारंभाचे अध्यक्षस्थान माजी खासदार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील भुषवणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील, तसेच विशेष अतिथी म्हणून इंद्रजीत देशमुख (काकाजी) उपस्थित राहणार आहेत.