कराड/प्रतिनिधी : –
मी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलून भाजप सरकारने योजना सुरू ठेवली. याच योजनेतून करोनात सगळीकडे मदत देण्यात आली. परंतु, कुठेही मोफत उपचार झाले नाहीत. याबाबतचा खोटा कांगावा सुरू आहे. मात्र, सर्वसामान्यांसाठी सरकारी आरोग्य यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
विविध विकासकामांच्या भूमिपूजन, उद्धघटन : कार्वे (ता. कराड) येथे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून पूर्ण व मंजूर झालेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन, उद्धघटन समारंभात ते बोलत होते. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर अध्यक्षस्थानी होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी प्रदेश काँग्रेसचे सदस्य अजितराव पाटील – चिखलीकर, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, युवा नेते इंद्रजित चव्हाण, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, माजी उपसभापती संभाजी चव्हाण, कोयना सहकारी दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, संचालक शिवाजीराव गावडे, माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, वैभव थोरात, कराड दक्षिण सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, कराड तालुका खरेदी – विक्री संघाचे माजी चेअरमन रंगराव थोरात, कार्वेचे माजी सरपंच वैभव थोरात, संताजी थोरात, विश्वासराव थोरात, कालवडेचे माजी सरपंच धनंजय थोरात, कार्वे ग्राम विकास सोसायटीचे चेअरमन सुजित थोरात, डॉ. सुधीर जगताप, अधिकराव जगताप, डॉ. विलासराव थोरात, कराड दक्षिण युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिग्विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमिषे दाखवून सर्वसामान्य जनतेची लूट : मोठ्या दवाखान्यांना आयकरात सुट मिळवताना काही मोफत उपक्रम राबवावे लागतात. यातूनच काही आमिषे दाखवून सर्वसामान्य जनतेची लूट ते करतात, असे सांगून आ. चव्हाण म्हणाले, याकरिता सरकारी आरोग्य यंत्रणा सक्षम करणे गरजेचे समजून माझे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून कार्वेसाठी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण झाले आहे.
रेठरे बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवणार : पुढील काळात रेठरे बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवून ग्रामीण रुग्णालयाच्या सुविधा करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. असा विश्वासही आ. चव्हाण यांनी व्यक्त केला. तसेच कार्वे गावची दहा वर्षांपासून प्रलंबित असणारी प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी आज पूर्ण होत आहे. या मोठ्या गावामध्ये जनतेच्या मालकीचा दवाखाना उभा राहिला पाहिजे, ही यामागे माझी भावना आहे.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव भाजपने महात्मा फुले योजना केले : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आम्ही सुरू केली. या योजनेचे नामांतर करून भाजप सरकारने महात्मा फुले योजना असे नाव केले. पण याच योजनेतून करोनातील उपचारासाठी दवाखान्यांना पैसे आले. परंतु, त्या दवाखान्यांनी ही वस्तुस्थिती लपवून खोटा प्रचार केला. केवळ नफ्याकरिता चाललेली ही खाजगी हॉस्पिटल आहेत. याकरिता आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करण्यासाठी पाठपुरावा केला.
म्हणून, विरोधी पक्ष विकासाचे खोटे बॅनर लावताहेत : आ. चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजपचा निर्णायक पराभव केला. शेतकरी विरोधी धोरणे, निर्यातबंदी, बेरोजगार युवक, महागाईने त्रस्त झालेल्या महिला भगिनी या सर्वांनी राज्यात भाजपचा पराभव केला. महाविकास आघाडीला 48 पैकी 31 जागा मिळाल्या. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हेच चित्र दिसणार आहे. व राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. मी मुख्यमंत्री असताना कराड दक्षिणमध्ये 1800 कोटी रुपयांची कामे केली. पण गेल्या दहा वर्षात भाजपचे सरकार असल्याने कामे झाली नाहीत. दुसऱ्या बाजूला काहीही न करता लोकसभेत पराभव झाल्याने विरोधी पक्ष विकासाचे खोटे बॅनर लावत आहेत.
दक्षिणेतील मतदार वैचारिक परंपरा मतदार सोडणार नाहीत : यापुढील काळात विकासाचा आराखडा पूर्ण करण्याचा विश्वास मी तुम्हाला देतो. कोणत्याही योजनेचा लोक विचार करणार नाहीत. याउलट काँग्रेसच्या जाहीरनाम्याची तुलना करतील व जनता आम्हालाच साथ देणार आहे, असे सांगून कराड दक्षिण मतदारसंघाची वैचारिक परंपरा मतदार सोडणार नाहीत. असा मला विश्वास आहे. असेही त्यांनी शेवटी सांगितले.
विकास कोणी केला हे सुज्ञ जनतेला माहिती आहे : अजितराव पाटील – चिखलीकर म्हणाले, बाबांनी केलेल्या कामांचे उद्घाटन करण्याचे काम विरोधक करत आहेत. पण सुज्ञ जनतेला विकास कोणी केला, हे सांगायला नको. हे महाशय कितीवेळा आमदारकीला उभे राहणार, त्यांची आमदारकीची इच्छा माझी पुरी करा. पण कोण करणार? असा सवाल करत उपस्थितांची दाद मिळवली.
वैभव थोरात, धनंजय थोरात यांची भाषणे झाली. विजय माने यांनी सूत्रसंचालन केले. शब्बीर मुजावर यांनी प्रास्ताविक केले. अशोकराव थोरात यांनी आभार मानले.