माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावतीने आयोजन
कराड/प्रतिनिधी : –
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावतीने शहरी भागासाठी राबविण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात कराड व मलकापूर शहरातील जवळपास 3500 नागरिकांनी लाभ घेतला. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, सातारा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राहुल चव्हाण, इंद्रजित चव्हाण, कराड दक्षिण युवक काँग्रेस अध्यक्ष दिग्विजय पाटील, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, प्रशांत देशमुख,आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मोफत आरोग्य सुविधांसाठी अर्थसंकल्पात तरतूद हवी :
यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यातील जनतेला आरोग्य सेवा ही मोफत दिली गेली पाहिजे. यासाठी सरकारने धोरण राबविले पाहिजेत व यानुसार अर्थसंकल्पात तरतूद केली गेली पाहिजे.
राजीव गांधी जीवनदायी योजना व 108 मोफत रुग्णवाहिका सेवा :माझ्या मुख्यमंत्री कार्यकाळात राजीव गांधी जीवनदायी योजना ही दीड लाख रुपयांपर्यंतची मोफत आरोग्य योजना सुरु करण्यात आली. तसेच राज्यभर 108 मोफत रुग्णवाहिका सेवा अशा प्रमुख योजना सुरु करता आल्या, त्याचा लाभ अजूनही जनतेला मिळत असल्याचे आ. चव्हाण यांनी यावेळी सांगितले. तसेच आजपर्यंत लाखो रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतलेला आहे. कराड व मलकापूर शहरात आयोजित केलेली आरोग्य शिबिरे याचा नक्कीच नागरिकांना फायदा होईल.
या तपासण्यांचा रुग्णांना मोफत लाभ :
या आरोग्य शिबिरात हृदयरोग, मेंदूरोग, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, चेस्ट अँड रेस्पिरेटरी मेडिसिन, नाक, कान व घसा, दंतरोग, फिजिओथेरिपी, आयुर्वेद, होमिओपॅथी, हाडांचे विकार, युरॉलॉजी आणि लेफ्रॉलॉजि, स्त्री रोग, लहान मुलांचे आजार, गेस्ट्रोलॉजि, अन्कॉलॉजी, त्वचा विकार, डोळ्यांचे विकार आदीवर तंज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली गेली. शिबिराला नागरिकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. असेच आरोग्य शिबिर मलकापूर शहरात सुद्धा आयोजित केले होते. ते तालुका वैद्यकीय विभाग अंतर्गत राबविण्यात आले होते.
जिल्हा परिषद गटनिहाय आरोग्य शिबिरे घेणार :माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, अशी आरोग्य शिबिरे जिल्हा परिषद गट निहाय आयोजित करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी माहिती दिली.