शाहू विचारांचा सर्वांनी आदर्श घ्यावा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

राजेंद्र घाडगे यांचे प्रतिपादन; शारदीय व्याख्यानमाला पुष्प सातवे, प्रत्येक समाजात समाजाचा उत्कर्ष करणारा पुढारी निर्माण व्हायला हवा 

कराड/प्रतिनिधी : –

राजश्री शाहू महाराजांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना समानतेची वागणूक दिली. देशातील नागरिक शिकला पाहिजे, असा त्यांचा अट्टाहास होता. समाज परिवर्तनाची सुरुवात महाराजांनी माणसांचे हृदय परिवर्तन करून केली. खऱ्या अर्थाने सत्यशोधक तत्त्वांची पायाभरणी करून अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट करण्याचे काम त्यांनी केले. अशा थोर तत्त्वज्ञानी, समता, बंधुता, मानवता आणि परिवर्तनाची कास धरणाऱ्या लोकराजा राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे प्रतिपादन इतिहास लेखक राजेंद्र घाडगे यांनी केले.

शारदीय व्याख्यानमाला पुष्प सातवे : कराड येथील नगरपरिषद आणि नगरवाचनालयातर्फे आयोजित 92 व्या शारदीय व्याख्यानमालेत बुधवार, दि. 8 रोजी सातवे पुष्प गुंफताना ‘छत्रपती राजश्री शाहू महाराज : एक अलौकिक व्यक्तिमत्व’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी नगरसेवक सौरभ पाटील, प्रशांत लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रत्येकाने शाहू महाराज समजून घ्यायला हवेत : श्री. घाडगे म्हणाले, शंभर वर्षांत शाहू महाराजांची खूप बदनामी झाली. ती आजही चालू आहे. परंतु, सिंहासनाऐवजी रयतेची काळजी घेणारा राजा कसा असावा, हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनंतर शाहू महाराजांनी दाखवून दिले. त्यांच्या सर्वसमावेशक, तसेच गोरगरीब, दीन-दुबळ्या लोकांच्या उद्धारासाठी समाजाचा, तसेच तत्कालीन धर्म व्यवस्थेचा रोष पत्करून केलेल्या कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे झालेल्या मेळाव्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांनीच शाहू महाराजांना राजश्री ही पदवी दिल्याचे त्यांनी सांगितले.

शाहू महाराजांबद्धल गौरोवोद्गार : महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, केशव ठाकरे यांनी शाहू महाराजांबाबत काढलेल्या गौवोद्गारांबद्धल बोलताना ते म्हणाले, शाहू महाराजांनी सत्यशोधक तत्वांची पायाभरणी करून अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट करण्याचे काम केले असल्याने महात्मा गांधी यांनी म्हटले होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्व जाती-धर्माच्या मुलांचे वसतिगृह सुरू करून त्याला शाहू महाराजांचे नाव दिले होते. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कर्मवीरांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे कार्य केले. शाहू महाराजांनी आंबेडकरांना समाजाचा उद्धार करण्यास सांगत मागास, दीन-दुबळ्या लोकांचा पुढारी म्हणून निवड केली. बाबासाहेब आंबेडकर उभ्या हिंदुस्थानाचे पुढारी झाल्याशिवाय राहणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले होते. आज संपूर्ण देशाने किंबहुना जगाने बाबासाहेबांना गौरविले आहे. शाहू महाराज माणसातला देव आहेत, त्यांचा वाढदिवसाच्या दिवाळसणासारखा साजरा करा, असे आंबेडकर म्हणाले होते. शाहू महाराजांनंतर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहूपुत्र राजाराम महाराज यांनी महाराजांच्या विचारांची चळवळ सुरू ठेवली. केशव ठाकरे यांनी शाहू महाराजांच्या विचारांनुसार पौराहित्यांच्या विरोधात लिखाण करून समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे काम केले.

कर्तृत्वशून्य माणसांनी मापे काढू नयेत : समाजाने शाहू महाराजांना नावे ठेवण्याआधी आपण समाजासाठी नव्हे; तर आपल्या नात्यातील माणसांसाठी किती मदत केली, हे पहावे, असे सांगत श्री. घाडगे म्हणाले, स्वतः कुणालाही मदत करायची नाही, मग अशा कर्तृत्वशून्य माणसांनी कशाला इतरांची मापे काढावीत, असे सांगून शाहू महाराजांची बदनामी करणाऱ्यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला.

शाहू, फुले, आंबेडकर विचारांची चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न : 2010 पासून समाजासमाजात फूट पडण्याचे काम चालू असल्याचे सांगत श्री. घाडगे म्हणाले, शाहू, फुले, आंबेडकर विचारांची चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न होत आहे. अन्यायाला वाचा फुटणे म्हणजे न्याय मिळाला असे होत नाही. कित्येक प्रकरणे वर्षांनुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रत्येक समाजात समाजाचा उत्कर्ष करणारा पुढारी निर्माण व्हायला हवा. तळागाळातील माणूस प्रशासनात आला, तर खरे स्वराज्य निर्माण होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जात-पात आणि सोशल मीडिया विसरा

समानता आणि समाज परिवर्तनाबाबत
शाहू महाराज आणि गंगाराम कांबळे यांची उदाहरणे देत गंगाराम कांबळे यांनीच शाहू महाराजांचे जगातील पहिले स्मारक कोल्हापुरात उभारल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच जात-पात आणि सोशल मीडिया विसरून पुढच्या पिढीला स्वतंत्र व समानतेच्या विचारांची वाट मळून द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शिव-शंभू चरित्र यशवंतराव चव्हाण यांनी प्रकाशात आणले

यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने असलेल्या या कराडच्या सभागृहात शाहू महाराज म्हणजेच यशवंतराव घाडगे आणि यशवंतराव चव्हाण या दोन यशवंतांच्या कीर्तीचाही त्यांनी उल्लेख केला. तसेच इतिहास संशोधक बा. शी. बेंद्रे यांच्याकरवी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे चरित्र खऱ्या अर्थाने समाजासमोर आणण्याचे काम यशवंतराव चव्हाण यांनी केल्याचे श्री. घाडगे यांनी यावेळी नमूद केले.

आजचे व्याख्यान रद्द 

प्रसिद्ध जगविख्यात उद्योगपती रतनजी टाटा यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राज्य सरकारने शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यानुसार कराडच्या शारदीय व्याख्यानमालेत आज गुरुवार, दि. 10 रोजी सायंकाळी 6.30 वाजता मुंबई-लंडन-मुंबई असा योगेश आलेकरी यांनी दुचाकीवरून केलेल्या साहसी प्रवास वर्णनाचा साईड शो सह विवेचनपर होणारे व्याख्यान रद्द करण्यात आले आहे. तरी सर्व श्रोत्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कराड नगरपालिका, तसेच नगरवाचनालयातर्फे ग्रंथपाल श्री. संजय शिंदे यांनी केले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!