कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गट कार्यालय, सांगली यांच्यावतीने आयोजित गटस्तरीय कामगार पुरुष भजन स्पर्धेत य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कामगार संघाने घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत कृष्णा कारखान्याच्या कामगार संघाने सांघिक तृतीय क्रमांक आणि उत्कृष्ट तालसंचलनासाठी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच वैयक्तिक स्तरावर पखवाजवादनाचे प्रथम पारितोषिक पटकावले.
विजेत्यांचा गौरव : विजेत्यांना समारंभाचे अध्यक्ष य. मो. कृष्णा कारखान्याचे व्यवस्थापक एच आर संदिप भोसले, प्रमुख पाहुणे महावितरणचे आस्थापना अधिकारी प्रकाश शिंदे, व सह्याद्री स्टार्चचे व्यवस्थापक एच आर विश्वास पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
कृष्णाला अध्यक्षस्थानाचा बहुमान : सांगली येथील वसंतदादा औद्योगिक वसाहतमधील ललित कला भवन येथे झालेल्या या पारितोषिक वितरण कार्यक्रमास महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सांगली गट कार्यालयाचे प्र.कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार, कराड केंद्र संचालक रूपेश मोरे, एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील उपस्थित होते. यावर्षी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविण्याचा बहुमान य. मो कृष्णा सहकारी कारखान्याचे एच आर मॅनेजर संदीप भोसले यांना मिळाला.
कल्याणकारी योजनांचा कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा : कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप भोसले म्हणाले, महाराष्ट्र कामगार मंडळाच्या वतीने कामगारांच्या सुख-समृद्धीसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांचा सर्व कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच सर्व संस्थांनी वर्षभरात किमान दोन कार्यक्रम आपापले आस्थापनांमध्ये घेऊन मंडळाचे विविध उपक्रम आपले कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचवावेत व बल्क सभासद नोंदणीबाबत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.
मंडळाने समूह विमा योजना राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा : संदीप भोसले यांनी कामगार व त्यांचे कुटुंबियांसाठी समूह विमा योजना राबविणेसाठी मंडळाने पुढाकार घ्यावा, असा प्रस्ताव मांडला. स्पर्धेतील सर्व विजेत्यांना आणि सहभागी संघांना शुभेच्छा देत पुढील गटस्तरीय भजन स्पर्धा कारखाना साईटवर आयोजित करण्याची मागणीही केली. मंडळाने याचा स्वीकार करत या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी द्यावी, अशी विनंती त्यांनी कृष्णा कारखाना व्यवस्थापनाच्यावतीने केली.
कामगार संघाचे केले कौतुक : या यशाबद्दल कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक मंडळ, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, कार्यकारी संचालक महावीर घोडके यांनी संपूर्ण संघाचे अभिनंदन केले आहे.
सांघिक व वैयक्तिक बक्षिसांची खैरात : या भजन स्पर्धेत कृष्णा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी सांघिकसह वैयक्तिक बक्षिसेही मिळवली. उत्कृष्ट पखवाजवादक म्हणून योगेश जवारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. संघात हणमंत काशीद, जयवंत सुतार, सुरेश कदम, दिलीप जवारे, योगेश जवारे, मल्हारी जवारे, शशिकांत साळुंखे, तानाजी चव्हाण, आनंदराव माने, दीपक काशीद, अतुल कुलकर्णी, मोहन माने या कामगारांचा सहभाग होता.
मोहन कदम यांनी विशेष परिश्रम घेत संघाचा नियोजनबद्ध सराव करून घेतला. कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार यांनी प्रास्ताविक केले. कराड केंद्र संचालक रूपेश मोरे यांनी आभार मानले.