कराड शहर व परिसरात सध्या नवरात्रोत्सवाचा मोठा उत्साह दिसून येत आहे. सर्व परिसरात असलेल्या देवींची नवरात्रोत्सवात विविध रूपातील आकर्षक महापूजा बांधण्यात येते. त्यानुसार शुक्रवारी कराडची ग्रामदेवता श्री कृष्णामाई देवीची मोरावर विराजमान झालेली महापूजा बांधण्यात आली होती.
दैत्यनिवारीणी देवीचीही महापूजा : कराडनगरीच्या प्रवेशद्वारावर वसलेल्या दैत्यनिवारीणी देवीचीही नवरात्रोत्सवानिमित्त शुक्रवारी महापूजा बांधण्यात आली होती. कृष्णामाई आणि दैत्यनिवारीणी देवींच्या दर्शनासाठी सायंकाळपासून महिला, युवती, तसेच भाविक-भक्तांनी रांगा लावल्या होत्या.
दक्षिण काशी म्हणून लौकिक : कराडनगरीचा दक्षिण काशी म्हणून लौकिक असून शहर व परिसरात अनेक देव-देवतांची मंदिरे आहेत. सण-उत्सवामध्ये त्या-त्या मंदिरांमध्ये उत्सविस्वरूपात कराडकर व पंचक्रोशीतील भक्तगण सण-उत्सव मोठ्या भक्ती-भावात पार पाडत असतात. नवरात्रात विशेषतः दैत्यनिवारणीला नित्याने जणू नियम म्हणूनच दर्शनासह आरती, पूजेला जाण्याचे महिला आणि युवतीवर्ग व्रत पाळतात. तसेच कृष्णामाईचे दर्शन घेणे व स्मरण करणे यालाही कराडकर व महिला प्राधान्य देत असतात.
दर्शनासाठी भाविकांच्या रांगा : शुक्रवारी कृष्णामाई आणि दैत्यनिवारीणी देवींची नवरात्रोत्सवानिमित्त महापूजा बांधण्यात आली होती. शुक्रवारी सायंकाळपासून देवीच्या दर्शनासाठी महिला, युवती, तसेच भाविक-भक्तांनी रांगा लावल्या होत्या. दोन्ही मंदिरांच्या ठिकाणी पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त ठेवला होता. मंदिर परिसरात पूजेसाठी आवश्यक साहित्यांची दुकाने लावण्यात आली होती. एकंदरीत नागरिक, भाविक-भक्तांमध्ये नवरात्रोत्सवाचा मोठा उत्साह असल्याचे दिसून येत आहे.