कराड/प्रतिनिधी : –
जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था (jankalyan Patra Sanstha) मर्यादित, कराडची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, दि. 26 रोजी कृष्णाबाई मंगल कार्यालय (जुने) कराड येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे (Chandrashekhar Deshpande) होते.
सभेचे नोटीस वाचन व सूत्रसंचालन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक फडके (Vinayak fadke) यांनी केले. सभेसमोर ठेवलेल्या सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मान्यता दिली.
913 कोटींचा एकत्रित व्यवसाय : विनायक फडके म्हणाले, 31 मार्च 2024 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाअखेर संस्थेकडे 545 कोटींच्या ठेवी जमा झाल्या असून 368 कोटी इतकी कर्जे वितरीत केली आहेत. संस्थेचा एकत्रित व्यवसाय 913 कोटी झाला असून संस्थेने 270 कोटी इतकी सुरक्षीत गुंतवणूक केली आहे. संस्थेस 31 मार्च 2024 अखेर रुपये 7 कोटी 37 लाखांहून अधिक तरतूदी अंती नफा झाला आहे. संस्थेने सहकारी पतसंस्थांच्या नियामक मंडळाने लागू केलेल्या सी.आर.ए.आर. 17.66 टक्के सी.आर.आर. 3.48 टक्के व एस.एल.आरचे 27.51 टक्के आवश्यक प्रमाण राखले आहे. तसेच अकौंटींग स्टैंडर्ड मधील तरतूदींचे पालन केले असून संस्थेस सन 2024 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षासाठी वैधानिक लेखा परीक्षकांकडून “अ” वर्ग मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
व्यवसाय वृध्दी व नफा वाढ हा एक दृष्टीकोन महत्वाचा : संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे यांनी मनोगतात संस्थेच्या प्रगतीचा व संस्थेने केलेल्या कार्याचा आढावा सादर केला. ते म्हणाले, या अहवाल वर्षामध्ये नियोजनबध्द काम करताना व्यवसाय वृध्दी व नफा वाढ हा एक दृष्टीकोन महत्वाचा होता. कर्ज मंजुरी व जलद वितरणाच्या प्रक्रियेने कर्ज व्याज उत्पन्न वाढले आहे. तसेच अहवाल वर्षात सुमारे 2 कोटींपर्यंत गुंतवणुकीवर वाढीव उत्पन्न मिळवले असल्याचे त्यांनी निवड सांगितले.
संस्थेच्या सुविधांचा सभासदांना लाभ : संस्था इ-सर्व्हिसेस माध्यमातून वीजबिल भरणे, विविध टॅक्सेस, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, मोटर इन्शुरन्स, अशा विविध प्रकारच्या विमा पॉलिसीज उतरवणे, फास्ट टॅग रिचार्जेस इ. सेवा देत आहे. त्याचा सभासद बहुसंख्येने लाभ घेत आहेत.
पुढील वर्षात आणखी 4 शाखा ग्राहकांच्या सेवेत : अहवाल वर्षात शाखा चाकण, पुणे येथे संस्थेच्या 17 व्या शाखेचे उद्दघाटन झाल्याचे सांगत पुढील वर्षामध्ये आणखी 4 शाखा ग्राहकांच्या सेवेत रुजू व्हाव्यात, या करीता संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याचे चंद्रशेखर देशपांडे यांनी सांगितले. तसेच महिलांसाठी विशेष चारचाकी कर्ज योजना 7 वर्षा करीता व्याज दर 9.50 टक्के या अल्पदरात सुरु केली असून त्याचा लाभ सर्व सभासद व ग्राहक यांनी घ्यावा, असे आवाहही केले.
सभासदांना दहा टक्के लाभांश : आर्थिक वर्षासाठी सभासदांना 10 टक्के एवढा लाभांश दिला जात असल्याचे चंद्रशेखर देशपांडे यांनी जाहीर केले. सभासदांच्या पाठींब्यामुळे संस्थेचा एकत्रित व्यवसाय 1000 कोटींच्या समीप आहे. सभासदांनी गेली 29 वर्ष संस्थेच्या संचालक मंडळावर दाखविलेल्या विश्वास व दिलेल्या पाठींब्याबद्दल त्यांनी सभासदांसह संचालक मंडळाने दिलेल्या योगदानाबद्दल संचालक मंडळाचेही आभार मानले.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. मिलींद पेंढारकर, संचालक डॉ. प्रकाश सप्रे, सी.ए. शिरीष गोडबोले, एकनाथ फिरंगे, हिंदुराव डुबल, जितेंद्र शहा, मोहन सर्वगोड, डॉ. सुचिता हुद्देदार, सौ. वर्षा कुलकर्णी, सौ. पुनम वास्के, दिपक जोशी, प्रविण देशपांडे, अभिजीत चाफेकर, सुनिल कुलकर्णी, सी.ए. आशुतोष गोडबोले, अशोक आटकर उपस्थित होते. संस्थेच्या संचालिका डॉ. सुचिता हुद्देदार यांनी आभार मानले.