‘आयुष्मान’अंतर्गत 70 वर्षांवरील ज्येष्ठांना विनामूल्य सेवा; ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
कराड/प्रतिनिधी : –
आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य (aayushman Bharat aarogya vima Yojana) या महत्वाकांक्षी आरोग्य विमा योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला आहे. या योजनेची तत्काळ अंमलबजावणी येथील कृष्णा हॉस्पिटलने (Krishna hospital) केली असून हॉस्पिटलमध्ये 70 वर्षांवरील ज्येष्ठांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली असून ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले (Dr Suresh Bhosle) यांनी केले आहे.
5 लाखापर्यंतचे आरोग्य विमा कवच :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजना राबिवली जाते. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना उपचारासाठी 5 लाखापर्यंतचे आरोग्य विमा कवच पुरविण्यात आले आहे.
आयुष्मान भारत योजनेचा विस्तार :पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयुष्मान भारत योजनेचा विस्तार करत, 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही उत्पन्न मर्यादेशिवाय आरोग्य विमा सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठांनाही आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे.
गावोगावी मोफत नोंदणी शिबिरे :आयुष्यान भारत योजनेच्या सुमारे 1,75,000 लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून गावोगावी मोफत नोंदणी शिबिरांचे आयोजन केले जात असून, पात्र लाभार्थ्यांना गोल्डन कार्डचेही वितरण केले जात आहे.
हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र नोंदणी कक्ष :केंद्र शासनाने या योजनेत आता 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश केल्याने त्यांच्या नोंदणीसाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र नोंदणी कक्ष साकारण्यात आला आहे.
आरोग्य मित्र करणार मार्गदर्शन : सदर मदत केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणीसोबतच त्यांना या योजनेअंतर्गत मोफत उपचारासाठी आरोग्य मित्राच्या मदतीने मार्गदर्शन केले जाणार आहे. या योजनेचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले आहे.