कराड प्रतिनिधी : –
येथील स्वरसंस्कार म्युझिक अकॅडमीतर्फे सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) जन्मशताब्दी वर्षानिमित्त शनिवार, दि. 21 व रविवार, दि. 22 सप्टेंबर रोजी मराठी चित्रपट संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) येथे आयोजित करण्यात आले आहे.
कराडमधील 25 रसिक गायकांचा सहभाग : कराडसह परिसराला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. येथील अनेक कलाकारांनी महाराष्ट्रासह देशभरात संगीत आणि गायन क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. या दोन दिवसीय संगीत महोत्सवातही कराडमधील 25 रसिक गायक सहभागी होणार असल्याने कराडकर रसिकांसाठी ही एकप्रकारची पर्वणीच असणार आहे.
कराड शहर व परिसरातील हौशी रसिक गायकांना आवाज साधना, सुगम संगीत व चित्रपट संगिताचे प्रशिक्षण देणाचे काम स्वरसंस्कार म्युझिक अकॅडमीच्यावतीने चित्रा कुलकर्णी व अभिजित कुलकर्णी करत आहेत. कराडमधील या गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या मराठी चित्रपट संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी, दि. 21 रोजी सायंकाळी 6 वाजता कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यादिवशी ‘गीत उमटले असे…’ हा मराठी चित्रपट गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.
गाण्यांच्या जन्मकथेतून उलगडणार स्वरप्रवास : या मराठी चित्रपट संगीत महोत्सवात गाण्यांच्या जन्मकथेतून उलगडत जाणारा स्वरप्रवास मांडण्यात येणार आहे. तर रविवारी, दि. 22 रोजी सायंकाळी 6 वाजता ‘रुपेरी – चंदेरी’ हा किस्से, आठवणी आणि गप्पांचा कार्यक्रम सादर होईल. मराठी चित्रपटाने कृष्णधवल ते रंगीत असा मोठा कालखंड पाहिला आहे. या काळातील गाजलेल्या मराठी चित्रपटगीतांचे स्मरण या महोत्सवाच्या निमित्ताने होणार आहे.
संगीत महोत्सव विनामूल्य : रसिकांसाठी हा चित्रपट संगीत महोत्सव विनामूल्य असून, सन्मानिकेसाठी रसिकांनी स्वरसंस्कार म्युझिक अकॅडमी, ‘अभिराम’, डी 23, रुक्मिणी विहार, मंगळवार पेठ, कराड (मोबा. 7083535927) अथवा डॉ. अतुल भोसले जनसंपर्क कार्यालय, लक्ष्मी – माधव बिल्डिंग, हॉटेल अलंकारजवळ, कराड (मोबा. 8888961591) याठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.